जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२१ । अतिवृष्टीमुळे धुळे -सोलापूर मार्गावरील कन्नड घाटातील रस्ता दरड कोसळल्याने बंद असून हा रस्ता लवकरच सुरु होणार असल्याची माहिती आहे. २९ ऑक्टोबरपासून घाटातील अवजड वाहतूक सुरू केली जाणार आहे, अशी माहिती घाटातील कामांचे कंत्राटदाराने दिली.
गेल्या दीड महिन्यांपूर्वी चाळीसगावसह परिसर अतिवृष्टी झाली होती. यामुळे धुळे -सोलापूर मार्गावरील कन्नड घाटातील रस्ता दरड कोसळल्याने बंद झाला होता. तसेच अनेक ठिकाणी रस्ता खचल्यामुळे घाटातील वाहतूक ठप्प झाली होती.
घाटातील रस्ता बंद झाल्याने कन्नड किंवा औरंगाबादला शिऊर बंगलामार्गे जावे लागत होते. त्यामार्गे वेळ आणि पैसे अधिक खर्च करावे लागत होते. परंतु आता दिवाळीपूर्वी म्हणजेच २९ ऑक्टोबरपासून बस व अवजड वाहनांसाठी घाटातील वाहतूक सुरू केली जाईल, अशी माहिती संत सतरामदास इन्को. प्रा. ली. कंपनीचे व्यवस्थापक राज पुंशी व भोजराज पुंशी यांनी दिली. आजही अवजड वाहनांना नांदगावमार्गे असलेल्या खराब रस्त्याने जावे लागते. त्यामुळे घाट कधी खुला होतो, याकडे लक्ष होते.
सांगवी फाटा ते तेलवाडी पर्यंत १५ किमी रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. तसेच घाटातील रस्त्यांच्या डांबरीकरणाला सुरुवात झाली आहे. घाटातील काही पूल वाहून गेल्याने नव्याने उभारणी केली जात आहे. ओलाव्यामुळे कामात अडचणी येत होत्या. मात्र, आता गती मिळाली आहे. कामे पूर्ण करण्यासाठी ९ महिन्यांचा कालावधी आहे.