जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । जळगाव-धुळेला जोडणाऱ्या ‘चाळीसगाव-धुळे पॅसेंजर’ला शुक्रवार दि.१५ रोजी १२१ वर्ष पूर्ण होत आहेत. १९०९ मध्ये सुरु झालेली पॅसेंजर मात्र, गेल्या वर्षभरापासून बंद आहे. त्यामुळे चाळीसगाव-धुळे पॅसेंजर लवकरात लवकर सुरु करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
जळगाव आणि धुळे जिल्ह्याचे नाते दृढ करणाऱ्या ‘चाळीसगाव-धुळे पॅसेंजर’ गाडीला शुक्रवार दि.१५ रोजी १२१ वर्ष पूर्ण होत आहेत. १५ ऑक्टोबर १९०९ रोजी ही पॅसेंजर गाडी सुरु झाली होती. सुरुवातीला कोळशाच्या इंजिनाद्वारे त्यानंतर १९८५ पासून डिझेल इंजिनच्या मदतीने धावणारी चाळीसगाव-धुळे पॅसेंजर इलेक्ट्रीक इंजिनच्या साहाय्याने धावत आहे. या गाडीला पूर्वी ‘दुधगाडी’ म्हणून ओळखले जायचे. कोळशाचे इंजिन, त्यानंतर डिझेल इंजिन व सध्या इलेक्ट्रीक इंजिन असा प्रवास करणारी ही पॅसेंजर गाडी सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी हक्काचे साधन आहे. सुरूवातीच्या काळात याच पॅसेंजरने चाळीसगाव येथून धुळ्यापर्यंत दुधाची वाहतूक केली जात होती. या गाडीच्या दिवसातून चार फेऱ्या होत असत.
वर्षभरापासून गाडी बंद
चाळीसगाव-धुळे या ५६ किमीच्या मार्गावर गाडी भोरस, जामदा, राजमाने, मोरदड तांडा, शिरुड, बोरविहिर, मोहाडी व धुळे या ८ स्थानकांवर थांबते. मध्य रेल्वेच्या अखत्यारीत असलेल्या या रेल्वेने चाळीसगावातून धुळ्यापर्यंत दुधाची वाहतूक केली जात होती. पुढे हे दूध मुंबईला पाठवले जात होते. या गाडीने अवघ्या १५ रुपयात चाळीसगाव ते धुळे प्रवास करता येतो. याच मार्गावर बसने जायचे म्हटल्यास ७५ रुपये भाडे द्यावे लागते. दरम्यान, गेल्या वर्षभरापासून पॅसेंजर बंद असल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
आदेशानंतरच पॅसेंजर होणार सुरु
कोरोनामुळे बंद पडलेल्या या गाडीची सेवा सुरू करण्यासंदर्भात वरिष्ठांचे कुठलेही आदेश नाहीत. आदेश प्राप्त झाल्यानंतर गाडी सुरू करण्यात येईल. सध्या गाडीची सेवा बंद असल्याने तिचा वाढदिवसही साजरा होऊ शकत नाही, असे चाळीसगाव स्टेशनचे प्रबंधक एन.पी.बडगुजर यांनी सांगितले.