जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२१ । रावेर तालुक्यातील पाल येथे माँ वैष्णवी गणेश मंडळातर्फे गरजू व हुशार विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
कोरोना महामारीत गोरगरीब विदयार्थ्यांना मदत करता यावी, या हेतूने मंडळातर्फे गणेश उत्सवानिमित्त काही दानशूर व्यक्तींकडून वर्गणी गोळा करण्यात आली होती. मंडळाने गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करून व त्यातून वाचलेल्या पैशातून १०० गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले. जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा, जि.प. प्राथमिक मराठी शाळा गोपाळ टेकडी, लीलाताई नामदेवराव पाटील आश्रम शाळा, जि.प. प्राथमिक मराठी शाळा बर्डीपुर या शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर, पेन, कम्पास, वही आदी शालेय साहित्य मोफत देण्यात आले.
दरवर्षी राबविणार उपक्रम
शालेय विदयार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटपाचा उपक्रमाचे हे पहिलेच वर्ष असून यापूर्वीही मंडळाकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध, गायन व क्रीडा स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत तसेच शेतकऱ्यांसाठी शेती विषयक कृषी तज्ञाकडून मार्गदर्शन आदी उपक्रम राबविण्यात आले आहेत. दरम्यान, मंडळाकडून कोरोना महामारीपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे म्हणून कोरोना लसीकरण शिबीरही घेण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी नवनवीन उपक्रम राबविण्यात येतील व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मदत करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. यावेळी मुख्यध्यापक महेंद्र वंजारी, राजु चौरे, हमीद तडवी, हरी चव्हाण, माणिक पाटील, रत्नपारखी सर, मनीष बाविस्कर, गणेश भोई, लखन चव्हाण, कैलास चव्हाण, जगदीश चव्हाण, राहुल चव्हाण, मयूर चव्हाण, सुरेश पवार, पवन चव्हाण, राजेश राठोड, धनंजय चव्हाण आदी उपस्थित होते.