जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२१ । राज्यात अनेक ठिकाणी पुन्हा मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. यानंतर आज पुन्हा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दरम्यान, आज जळगाव जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. काल जिल्ह्यातील विविध ठिकाणी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सध्या वायव्य भारतात मान्सूनच्या परतीसाठी अनुकूल परिस्थिती आहे. कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे शाहीन वादळाचा शनिवारी (9 ऑक्टोबर) आणि रविवारी (10 ऑक्टोबर) उत्तर महाराष्ट्राला जबर तडाखा बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे दोन दिवस जळगाव जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
आज जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. कालच जिल्ह्यातील विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे भुसावळ, रावेर, यावल, वरणगाव, बोदवड भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात उरले-सुरले पीक हाती येणार असे शेतकऱ्यांना वाटत असताना आता आणखी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने उरले-सुरले पीकही वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.
दरम्यान, सुरुवातीच्या मान्सून पावसाने जळगाव जिल्ह्यात पाठ फिरवली होती. जून आणि जुलै मध्ये जिल्ह्यात पावसाने म्हणावी तशी जोरदार हजेरी लावली नव्हती. अधूनमधून झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु त्यात पावसाने भरपूर दिवस दडी मारल्याने शेतकरी हतबल झाला होता. मान्सूनच्या सुरुवातीच्या दीड महिन्यात जिल्ह्यात केवळ ५० टक्के मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. परंतु ऑगस्टच्या पंधरवड्यात पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने पिकांना जीवनदान मिळाले होते. त्यांनतर सप्टेंबर महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील बहुतांश धरणातील पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात वाढला. जिल्ह्यातील बहुतांश धरण १०० टक्के भरली गेली आहे.