जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । पट्टेदार वाघांच्या अधिवासास पुरक वनक्षेत्र असलेले तालुक्यातील वनक्षेत्र जिल्ह्यातच नव्हे तर देशांतर्गत सुप्रसिध्द असुन जवळपास दोन दशकांपासून वेळोवळी पट्टेदार वाघांचे अस्तित्व सिद्ध झाले असुन डोलारखेडा परिमंडळातील मरीमाता मंदीर परीसर तसेच सुकळी वनहद्दीगतच्या नाना चव्हाण यांच्या शेतातील केळी बागेत दोन वेळा वाघिणीने पिल्लांना जन्म दिल्याच्या नोंदी आहे.तसेच तीन वाघांचा मृत्युही झाल्याच्या दुर्देवी घटना घडलेल्या आहेत.सद्यस्थितीतही आठ-दहा वाघांचा अधिवास कायम आहे.
आतापर्यंत हवा तेवढा विकास सदर वनक्षेत्राचा झालेला नसल्याची खंत वन्यप्रेमी यांना आहे. यासंदर्भात मुक्ताईनगर विधानसभा आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन व्याघ्र संवर्धन क्षेत्रातील विकासाच्या दृष्टीकोनातून विविध ठोस उपाययोजना राबविण्यात याव्या अशा मागण्या निवेदनात केल्या.तसेच याबाबत चर्चा देखील केली वढोदा वनपरिक्षेत्र १२२ चौ.कि.मी पसरलेले असुन तापी-पुर्णा नद्यांनी वेढलेले आहे.उत्तरेकडे मध्य प्रदेशची सीमा,पुर्वेस बुलढाणा सीमे पर्यत विस्तिर्ण वनक्षेत्र विविध वनसंपदेने नटलेले आहे. कुंड,भाटी,कवानी धरण,शिव तलाव,रामगड तलाव इत्यादी जलस्रोत आहे.जैवविविधतेने नटलेल्या या जंगलात आठ ते दहा पट्टेदार वाघांचे अस्तित्वासह निलगाय,हरिण, काळवीट,रानगवा,चितळ,अस्वल, रानडुक्कर,तळस,कोल्हा,लांडगे अशा प्राण्यांची वास्तव्य आहे.
या भागात वाघांचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने कुरण विकास योजना,फळबाग योजना आदी कामे होणे आवश्यक आहे. जेणेकरुन तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढेल. तसेच या भागात पुरातन हेमाडपंथीय मंदिरे आहेत.त्यांचेही संवर्धन होणे गरजेचे आहेत.निसर्ग पर्यटन योजनेतर्गत विकास झाल्यास स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल.बाहेरून येणाऱ्या पर्यटकांपासुन अनेक स्थानिकांना रोजगार मिळु शकेल अशी जनतेची मागणी आहे.अशा प्रकारची चर्चा वर्षा निवासस्थानी दि ५ रोजी पार पडली. याबाबतची मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना केली. याप्रसंगी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची उपस्थिती होती.