महावितरण कर्मचाऱ्यांनी चिखल, पाण्यातून काढली वाट!

ऑक्टोबर 3, 2021 6:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२१ । वादळी पाऊस आणि विजेच्या कडकडाटामुळे शनिवार दि. २ ऑक्टोबर रोजी पहाटे भडगाव तालुक्यातील तीन वीज उपकेंद्रे बंद पडून वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी चिखल आणि ओढे-नाल्यातुन वाट काढत ३३ केव्ही वाहिनी दुरुस्त करून वीजपुरवठा पूर्ववत केला.

Untitled design 2021 10 03T181124.583 jpg webp

पाचोरा-भडगाव परिसरात शनिवारी पहाटे ५ वाजेपासून वादळी पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान, पाचोरा ते भडगाव या ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीवर वीज पडल्यामुळे त्यात बिघाड होऊन भडगाव, लोण पिराचे व वडजी ही तीन उपकेंद्रे बंद पडली होती. भडगाव तालुक्यातील जवळपास १० ते १२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. पाचोरा ते भडगाव या विद्युत वाहिनीचे अंतर १४ किमीचे असल्याने बंद पडलेल्या ३३ केव्ही वाहिनीवर झालेला बिघाड शोधून तो दुरुस्त करणे जिकिरीचे होते आणि त्यासाठी वेळ लागणार होता. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पर्यायी मार्गाने दुपारी अडीच वाजेपर्यंत ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला. मात्र पर्यायी व्यवस्था ही तात्पुरती असल्याने बंद पडलेली वाहिनी सुरू करणे आवश्यक होते. पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी आणि चिखल झालेला असतांना रानावनातून जाणाऱ्या वाहिनीवरील बिघाड शोधणे सोपे नव्हते. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीतही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी चिखल तुडवत आणि ओढे-नाल्यांतील पाण्यातून वाट काढत बिघाड शोधण्यास सुरुवात केली. वाहिनीवरील प्रत्येक खांबावर चढून त्याचे इन्सुलेटर तपासले असता वेगवेगळ्या खांबांवरील जवळपास १६ इन्सुलेटर फुटल्याचे व पंक्चर झाल्याचे आढळून आले. ते सर्व इन्सुलेटर बदलण्यात आले. काम सुरू असताना अधूनमधून पाऊस सुरु असतानाही महावितरण कर्मचाऱ्यांचे काम सुरूच होते. सकाळपासून काम करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संध्याकाळी ६.५० वाजता पाचोरा-भडगाव ३३ केव्ही वाहिनीवरील वीजपुरवठा पूर्ववत केला.

यांनी फत्ते केली कामगिरी
भडगाव उपविभागाचे प्रभारी उपकार्यकरी अभियंता रवींद्र राऊळ, भडगाव ग्रामीण कक्षाचे कनिष्ठ अभियंता विवेक जोशी, कोळगाव कक्षाचे सहायक अभियंता विजय पवार, पारोळा कक्षाचे कनिष्ठ अभियंता अनुज धर्माधिकारी, जनमित्र आनंदराव पाटील, वसीम अली, संदीप सोनवणे, भूषण पाटील, योगेश पवार, कपले, बाह्यस्रोत कर्मचारी सुनील भदाणे, मोहसीन अली, योगेश परदेशी, सय्यद अली, नरेंद्र राजपूत यांनी ही कामगिरी केली. या कामगिरीबद्दल सर्व अभियंते व कर्मचाऱ्यांचे जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, अधीक्षक अभियंता फारूक शेख, प्रभारी कार्यकारी अभियंता राम चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now