दुचाकींची चोरी करून ठेवत होते गहाण, दोघांनी काढून दिल्या १९ दुचाकी
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२१ । जिल्ह्यात वेगवेगळया ठिकाणी जाऊन दुचाकी चोरी करून त्या दुचाकी गहाण ठेऊन पैसे लुटणाऱ्या चोरट्यांचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून या दोघा चोरट्यांकडून तब्ब्ल १९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
जळगाव शहरासह जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या दुचाकी चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आले होते. त्यादिशेने तपास सुरु असतांना स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना आरिफ शरीफ तडवी (रा. पहूर) हा त्याच्या अन्य एका साथीदारासह दुचाकी चोरी करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पथक पहूर येथे जाऊन त्याचा शोध घेत असतांना तो जामनेर पहूर रोडवर मोटर सायकलसह मिळून आला. पथकाने त्याला विचारपूस केलीच असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला खाकी दाखविल्यानंतर त्याने त्याचा साथीदार चेतन संजय चव्हाण (रा.लोहारा, ता.पाचोरा) याच्याशी मिळून चोरी केल्याची कबुली दिली.
तब्बल १९ दुचाकी जप्त
पथकाने आरिफ शरीफ तडवी (रा. पहूर) व चेतन संजय चव्हाण (रा.लोहारा, ता.पाचोरा) या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर यांच्याकडून ५ लाख १५ हजार रुपये किमतीच्या १९ दुचाकी जप्त केल्या आहेत. दोघाही चोरट्यांवर पाचोरा पोलीस स्टेशनला ८, जळगाव एमआयडीसी पोस्टेला ३, जामनेर व पिंपळगाव हरेश्वर पोस्टेला प्रत्येकी २ व पहूर पोस्टेला १ असे १६ गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पथकात यांचा होता समावेश
स्थानिक गुन्हे शाखेने नेमलेल्या पथकात सफौ. अशोक महाजन, रवि नरवाडे, पोहेकॉ. महेश महाजन, पोना. किशोर राठोड, रणजित जाधव, अशोक पाटील, श्रीकृष्ण देशमुख, मुरलीधर बारी, पोकॉ. विनोद पाटील, उमेशगीरी गोसावी, ईश्वर पाटील, हेमंत पाटील, पोहेकॉ. दीपक चौधरी आदींचा समावेश होता. या पथकाने ही कारवाई केली.