जळगावातही ‘खून का बदला खून’, आजच्या घटनेला जुन्या वादाची किनार!

सप्टेंबर 23, 2021 11:47 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२१ । जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी भुसावळ येथे झालेले ‘खून का बदला खून’ असा प्रकार पुन्हा एकदा सुरू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी नशिराबाद येथे गोळीबारचा प्रकार झाल्यानंतर आज सकाळी पुन्हा जळगाव शहरात ‘खून का बदला खून’चा प्रकार घडला आहे. दरम्यान, आजच्या घटनेमागे माजी महापौर अशोक सपकाळे यांच्या मुलाच्या खुनाची किनार असल्याचे समजते.

Untitled design 83 jpg webp

गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ५ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री शिवाजीनगरातील स्मशानभूमिजवळ रात्री ११.३० च्या सुमारास माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश अशोक सपकाळे (वय २८) याचा एका टोळक्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. हल्लेखोरांनी लागलीच घटनास्थळावरून पळ काढला होता. जुन्या वादातून राकेश सपकाळेचा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते.

या खून प्रकरणी आकाश मुरलीधर सपकाळे (रा. कांचन नगर); गणेश दंगल सोनवणे (रा. वाल्मिक नगर), विशाल संजय सपकाळे (रा.राजाराम नगर), रुपेश संजय सपकाळे (रा.कांचन नगर) आणि महेश राजू निंबाळकर यांना अटक करण्यात आली होती. यातील संशयितांना नंतर जामीन मिळाला होता. यातीलच एक संशयित आकाश सपकाळे याच्यावर हल्लेखोरांनी आज सकाळी आठच्या सुमारास घरात शिरून हल्ला केला. प्राथमिक तपासात या खूनाचा आजच्या हल्ल्याशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे.

आकाश मुरलीधर सपकाळे शनीपेठ पोलिसात तक्रार देण्यासाठी पोहचला आहे. आकाशने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी आठच्या सुमारास आकाश आणि त्याचा भाऊ सागर हे घरात पलंगावर झोपलेले होते. सागर हा लोळलेला असताना विक्की अलोने नामक तरुण अचानक घरात घुसला व आकाशच्या अंगावरील चादर ओढून त्याने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. भाऊ व वडिलांनी भावाने तात्काळ एका हल्लेखोराला पकडून धरले व त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. घरात केलेल्या राउंड फायरमध्ये आकाशच्या करंगळीला गोळी लागल्याने त्याला जखम झाली आहे तर सागरला देखील दुखापत झाली आहे. इतर हल्लेखोर लागलीच घरातून बाहेर पडून दुचाकींवरून पळून गेले. मात्र त्यातील एक जण हा घराबाहेर धावतांना पायर्‍यांवरून पाय घसरून पडल्याने तो रक्तबंबाळ अवस्थेत तिथेच बेशुध्द होऊन पडला.

गोळीबार आणि आरडाओरड ऐकून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी घराबाहेर पडलेल्या जखमी विक्की अलोनेला आणि त्याच्या बाजूलाच पडलेले पिस्तुल, मोबाईल आणि काडतूस पोलिसांनी ताब्यात घेतले. या हल्ल्यात चार जणांनी सुमारे सहा फैरी झाडल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच शनिपेठचे निरिक्षक बळीराम हिरे आणि सहकार्‍यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी आणि सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांनी सुध्दा घटनास्थळाची पाहणी करून तपासाची चक्रे वेगवान फिरविण्यास सुरुवात केली आहे. आकाश सपकाळे याने दिलेल्या माहितीनुसार, हल्ला विक्की अलोने, बाबू सपकाळे, सोनू सपकाळे व मिलिंद सकट यांनी केला होता. हल्ला का आणि कशासाठी केला हे नेमके सांगता येणार नाही अशी माहिती आकाशने दिली आहे.

 

पहा काय म्हणाला आकाश सपकाळे :-

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/1753918101465621/

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now