मुलगा ‘गणेश’ला फोन करून पित्याची गणेश विसर्जनाला आत्महत्या

सप्टेंबर 19, 2021 6:45 PM

 

0001 8195038810 20210919 182528 0000 1 jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२१ । पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खुर्द येथील ५७ वर्षीय शेतमजूर पित्याने मामाच्या गावी गेलेल्या मुलगा गणेशला भ्रमणध्वनीवरून आत्महत्या करीत असल्याचे सांगून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गणेश विसर्जनाच्या दिवशी पहाटे घडली आहे.

अंतुर्ली खुर्द येथील ईश्वर गोसावी हे पत्नी व मुलांसह शेतमजुरीची कामे करतात. शनिवार दि.१८ रोजी सकाळी त्यांची पत्नी व दोन्ही मुले तारखेडा ता.पाचोरा येथे मामाच्या गावी गेले होते. ईश्वर गोसावी घरी एकटेच होते.

रविवार दि.१९ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास ईश्वर यांनी मुलगा गणेशच्या भ्रमणध्वनीवर फोन करून ‘मी आत्महत्या करीत आहे..’ असे कळविले. पित्याचे हे वाक्य ऐकून मूलगा गणेश याने तुम्हाला काय त्रास आहे? असे काही करू नका आम्ही आलोच.. असे समजावण्याचा प्रयत्न करत असतानाच ईश्वर गोसावींनी फोन बंद केला.

मुलाला कळविल्यानंतर ईश्वर यांनी घरात छताला दोरी बांधून गळफास घेतला. पत्नी व दोन्ही मुले लगबगीने अंतुर्ली येथे घरी परतले. घरी ईश्वर यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून गोसावी कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला. त्यांना लगबगीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.अमित साळुंखे यांनी पोलिसांना माहिती देत शवविच्छेदन केले.

याप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत ईश्वर गोसावी यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, दोन मुले असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुर्यकांत नाईक, नरेंद्र सुरवाडे तपास करीत आहेत. ईश्वर यांनी आत्महत्या का केली याचे नेमके कारण समजून आलेले नाही. गणेश विसर्जनाच्या दिवशीच घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now