शेतकऱ्यांना संधी : ‘या’ योजनेसाठी अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२१ । एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजना सन 2021-22 अंतर्गत जिल्ह्यास वार्षिक कृती आराखडा मंजुर झाला असून सदर योजनेतंर्गत नमूद केलेल्या घटकांकरीता जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अळिंबी उत्पादन केंद्रासाठी अनुदान मर्यादा 8 लाख रुप्ये, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन (आंबा पिकासाठी) रुपये 20 रुपये, सामुहिक शेततळे 24x24x4 मी. आकारमानासाठी 1 लाख 75 हजार रुपये, 34x34x4.7 मी. आकारमानासाठी 3 लाख 39 हजार रुपये, शेततळे अस्तरीकरणासाठी जास्तीत जास्त 75 हजार रुपये, संरक्षित शेती अंतर्गत हरितगृह व शेडनेटगृहासाठी मॉडेलनिहाय मंजुर खर्च मापदंडानुसार किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के (जे कमी असेल ते), प्लॉस्टिक मल्चिंग 16 हजार रुपये, (जास्तीत जास्त 2.00 हेक्टर पर्यंत), टॅक्टर 20 अश्वशक्तीपर्यंत सर्वसाधारण प्रवर्गातील महाभुधारक लाभार्थ्यासाठी 75 हजार रुपये व सर्वसाधारण प्रवर्गातील अल्पभुधारक, अनु. जाती, अनु. जमाती, महिला शेतकरी यांना 1 लाख रुपये, शितखोली ग्राह्य भांडवली खर्चाच्या 35 टक्के रुपये 5 लाख 25 हजार रुपये, प्राथमिक प्रक्रिया केंद्र ग्राह्य भांडवली खर्चाच्या 40 टक्के रुपये 10 लाख रुपये, कांदाचाळ उभारणीसाठी ग्राह्य भांडवली खर्चाच्या 50 टक्के रुपये 87 हजार 500 रुपये, मधुमक्षिका वसाहत व संच वाटपासाठी ग्राह्य भांडवली खर्चाच्या 40 टक्के रुपये 40 हजार , स्थाई/ फिरते/विक्री केंद्र शित चेंबरच्या सुविधेसह यासाठी ग्राह्य भांडवली खर्चाच्या 50 टक्के रुपये 15 हजार रुपये, पॅक हाऊससाठी ग्राह्य भांडवली खर्चाच्या 50 टक्के रुपये 2 लाख, ड्रॅगन फ्रुट, अंजीर व किवी लागवडीसाठी प्रति हेक्टर रुपये 96 हजार रुपये याप्रमाणे अनुदान देय राहील.
शेतकरी बांधवांनी या घटकांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शेतकरी योजना हा पर्याय निवडून अर्ज सादर करावा. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बंधूनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डाशी संलग्न करणे आवश्यक राहील. पोर्टलवर प्राप्त अर्जाची ऑनलाईन लॉटरी, पुर्वसंमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इत्यादी प्रक्रिया ऑनलाईन होणार असल्याने या योजनेचा लाभ घेण्यास इच्छूक शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर त्वरीत अर्ज सादर करावेत. असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.