जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२४ । गेल्या दोन तीन दिवसापासून जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४५ अंशावर गेल्याने प्रचंड उष्णता जाणवत आहे. भाजून काढणाऱ्या उन्हाच्या चटक्यामुळे जळगावकर होरपळून निघत आहे. यातच उन्हाच्या कडकाच्या फटक्यात चक्क वाहनाला आग लागल्याची घटना जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर घडली आहे.

जळगाव जिल्ह्यातही सध्या उष्णतेची मोठी लाट पसरली असून या उष्णतेच्या लाटेमुळे वाहनांमध्ये आग लागण्याच्या घटना घडत आहेत. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात भवानी माथाजवळ जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर अचानक एका ट्रकने पेट घेतल्याचे दिसून आले. या ट्रकमधून गव्हाच्या पोत्यांची वाहूतक करण्यात येत होती. गव्हाच्या पोत्यांनी भरलेल्या या ट्रकला आग लागल्यामुळे उन्हाची तीव्रता लक्षात येईल.
दरम्यान, या घटनेनंतर अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले, मात्र अग्निशमनची बंब येईपर्यंत ट्रकचे जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा उष्णतेची लाट आल्याचं बोलंलं जात आहे. त्यामुळे, नागरिकांनी दुपारच्या प्रहरात अनावश्यक घराबाहेर न पडण्याचा सल्लाही जाणकारांकडून देण्यात येत आहे.