जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२१ । शहरातील ईच्छादेवी चौफुलीजवळ असलेल्या वखार शेजारील मोकळ्या जागेवर मंगळवारी सायंकाळी अनेक अर्भक मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, काही इंच आकारापासून एक फुटापर्यंत हे अर्भक असल्याने ते खरे आहेत की खोटे यावरून वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहे. घटनास्थळी पोलीस पोहचले असून तपास सुरू आहे.
ईच्छादेवी चौफुली ते अजिंठा चौफुली दरम्यान वखार आहे. वखारी शेजारी मोकळी जागा असून त्या ठिकाणी कचरा टाकलेला असतो. मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या काही मुले त्याठिकाणी कचरा वेचत असताना त्यांना मानवी अर्भक सदृश्य गोष्टी आढळून आल्या. एकदम लहान आकाराचे अर्भक बाटल्यांमध्ये तर इतर मोठे अर्भक मोकळे टाकलेले होते. घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास सुरुवात केली. कचऱ्यात मिळालेले मृत अर्भक हे मानवी आहेत इतर काही वस्तू यावरून तर्कवितर्क करण्यास सुरुवात झाली. दरम्यान, घटनास्थळी एमआयडीसी पोलिसांनी धाव घेत चौकशीला सुरुवात केली.
पोलिसांनी एका भंगार विक्रेत्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने एका डॉक्टराकडून काही भंगार खरेदी केले होते त्या भंगारातील एका खोक्यांमध्ये ठेवलेल्या बाटल्यांमध्ये हे अर्भक आढळून आले. नेमके ते काय आहे हे माहिती नसल्याने एका मुलाला ते बाहेर कचऱ्यात फेकण्यास सांगितले होते असे उत्तर त्याने दिले आहे.
पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी केली जात असून रुग्णालयातून निघालेला कचरा हा विशिष्ट पद्धतीने नष्ट करण्याच्या निर्देश असतानाही भंगार विक्रेत्याकडे हे अर्भक पोहोचलेच कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, एखाद्या डॉक्टरने संशोधनासाठी संकलित करून ठेवलेले हे अर्भक प्लास्टिकचे असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.