⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

शनीपेठ दंगल : ८ नावे निष्पन्न, ३० जणांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२२ । शहरातील शनीपेठ परिसरात गवळीवाडा प्रवेशद्वारासमोर रविवारी रात्री दोन गटात वाद होऊन जोरदार दगडफेक झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी फिर्यादी होत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात केला आहे. अद्याप आठ नावे निष्पन्न झाली असून पंचवीस ते तीस अज्ञातांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा आणि दंगलीचा गुन्हा दाखल आहे.

जळगाव शहरातील शनीपेठ परिसरात रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास उसनवारीच्या पैशातून दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. काही वेळात वाद वाढल्याने दोन्ही गटाकडून जोरदार दगडफेक करण्यात आली होती. दगडफेकीत ३ वाहनांचे नुकसान होऊन २ होमगार्ड देखील जखमी झाले होते. रात्री उशिरापर्यंत कुणीही तक्रारदार समोर न आल्याने सहाय्यक फौजदार नंदकिशोर पाटील यांनी स्वतः फिर्यादी होत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

शनीपेठ पोलीस ठाण्यात वैभव राजेंद्र अहिरे उर्फ बबलू वाणी, सै.मोहसीन उर्फ काल्या हनीफ, खालीद शेख गुलाम रसूल, इकराम ताहेर शेख यांच्यासह दीपक गवळी, भोला राजू गवळी, महेश गवळी, जुबेर आणि २५ ते ३० अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी भादंवि कलम १४३, १४७, १४८, ३०७, ३५३, ३३२, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. इतर संशयितांची नावे आणि ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बळीराम हिरे करीत आहे.

अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी स्वतः या प्रकरणात लक्ष घालत असून सोमवारी सकाळी देखील त्यांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात हजेरी लावत माहिती घेतली. अपर पोलीस अधिक्षकांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना केली असून संशयितांची कुंडली मागवली आहे. अटक केलेल्या संशयितांना दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.