जळगाव जिल्हा

..ते घरात पडले, अंथरुणाला खिळले, अन्‌ सव्वा महिन्याने चक्क चालू लागले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑगस्ट २०२१ । आपल्या घरात पडल्यानंतर पायाचा खुबा (कमरेतील बॉल) फ्रॅक्चर झाल्याने ८५ वर्षीय मुरलीधर शंकर निकुंभ हे तब्बल महिनाभरापासून अंथरुणाला खिळून होते. दरम्यानच्या काळात कुटुंबीयांनी दोन-तीन डॉक्टरांना दाखवले. पण, निकुंभ यांचे वय आणि त्यांना असलेली हृदयाच्या झडपेची व्याधी पाहता कुणीही शस्त्रक्रिया करायला धजावले नाही. पण, श्री गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी हे आव्हान पेलले आणि अवघ्या आठ दिवसांच्या उपचारानंतर निकुंभ हे आपल्या पायांवर उभे राहिले.

जळगाव शहरातील महाबळ परिसरात राहणारे मुरलीधर निकुंभ हे सव्वा महिन्यापूर्वी आपल्या घरातच पडले आणि त्यांच्या पायाचा खुबा मोडला. परिणामी त्यांनी चालणेच काय पण साधे उभे राहणेही शक्य होत नव्हते. त्यांच्या कुटुंबीयांनी शहरातील दोन-तीन रुग्णालयांमध्ये उपचारासाठी नेले. त्यांची खुब्याची शस्त्रक्रिया करावी लागणार होती. मात्र, त्यांचे ८५ वर्षांचे वय आणि त्यांना पूर्वीच असलेल्या हृदयाच्या झडपेची व्याधी पाहता डॉक्टरांनी शस्रक्रिया करण्याची रिस्क न घेता त्यांना घरी परत पाठवले. कारण वय आणि झडपेचा आजार पाहता त्यांना भूल देऊन शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. अखेर त्यांनी देवकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल गाठले. या ठिकाणी हृदयाच्या व अन्य सर्वच चाचण्याची सोय एकाच छताखाली असल्याने तेथील डॉक्टरांनी या शस्त्रक्रियेचे आव्हान पेलत निकुंभ यांच्यावर उपचार करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार निकुंभ यांच्या सर्व चाचण्या दोन दिवसांत पार पाडून शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांचा चमू सिद्ध झाला. यात अस्थिशल्यविशारद डॉ. अभिजित पाटील यांच्यासह आयसीयू तज्ञ डॉ. प्रियांका अभिजित पाटील, भूलतज्ञ ललित पाटील डॉ. स्नेहल गिरी, डॉ. आशिअन्वर, डॉ. अमित नेमाडे, डॉ. नितीन पाटील यांनी शस्त्रक्रियेची तयारी केली अन्‌ अवघ्या दोन तासांत या चमूने ही शस्त्रक्रिया लिलया पार पाडली. दहा दिवसांच्य विश्रांती आणि व्यायामानंतर निकुंभ यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. कारण तब्बल सव्वा महिन्यांनतर ते पुन्हा आपल्या पायावर चालू लागले होते.
या अत्यंत जिकिरीच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयाचे संस्थापक संचालक माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी स्वतः निकुंभ यांची विचारपूस करून डॉक्टरांच्या टीमचे तोंडभरून कौतुक केले.

चाचण्यांचे अहवाल पाहून घेतला निर्णय : डॉ.पाटील
श्री गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदयासंबंधीच्या व अन्य सर्व चाचण्यांची सोय असल्याने त्या तातडीने करणे आणि ते रिपोर्ट पाहून शस्त्रक्रिया करण्याची रिस्क आम्ही घेतली. आणि रुग्णाची संपूर्ण सरक्षा आणि काळजी घेत आम्ही ही शस्रक्रिया लिलया यशस्वी केली. एका वृद्धाचे उतारवयात होऊ पाहणारे हाल आम्ही टाळू शकलो याचे मनस्वी समाधान आहे, असे अस्थिशल्यविशारद डॉ.अभिजित पाटील यांनी सांगितले.

????व्हिडीओ :

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/981265362662582/

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button