⁠ 
शनिवार, जून 22, 2024

मालकाला गुंगीचे सरबत पाजून घरगड्याने टाकला दरोडा ; जळगावातील धक्कादायक प्रकार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२४ । जळगाव शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून घरफोडीच्या घटना काही केल्या कमी होत नाहीय. अशातच जळगावातील राजा ट्रॅक्टरचे मालक व्यावसायिक राजा मयूर यांच्यासह दोन सुरक्षारक्षकांना गुंगीचे औषध टाकलेले सरबत पाजून दरोडा टाकल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. हा दरोडा त्यांच्या ठिकाणी काम करणार्‍या एकाने इतर चार जणांच्या मदतीने टाकल्याचे समोर आले आहे.

नेमकी काय आहे घटना?
जळगाव शहरातील दूध फेडरेशन परिसरात राजा ट्रॅक्टरचे मालक राजेंद्र अनिल मयूर उर्फ राजा मयूर वय ८४ हे आपल्या पत्नीसह या ठिकाणी वास्तव्याला आहेत. दरम्यान त्यांच्या बंगल्यावर विकास नेपाळी नावाचा माणूस देखील कामाला होता. राजा मयूर यांच्या घराच्या बाजूलाच त्यांची खोलीत तो राहत होता. या बंगल्यात दोन सुरक्षारक्षक देखील रात्रीला पहारा देत असतात.

दरम्यान गुरुवारी ३० मे रोजी रात्री १०.३० वाजता विकास नेपाळी याने भावाला मुलगा झाला असे सांगून सुरक्षारक्षक वसंत श्रीखंडे व उदय समेळ यांना सरबत पाजले. या सरबतमध्ये त्याने गुंगीचे औषध टाकले होते. तसेच त्यांनी हे सरबत राजा मयूर यांना देखील पाजले. त्यामुळे दोनही सुरक्षारक्षक आणि राजा मयूर हे बेशुद्ध झाले. त्यानंतर आज पहाटे दोन वाजता विकास नेपाळी याने त्याचे साथीदार असलेल्या चार जणांना बोलावून घेतले. त्यावेळी घरात राजा मयूर यांची पत्नी शैला मयूर यांना बाथरूममध्ये बंद करून त्यांना धमकी दिली. यामुळे त्या घाबरून गप्प बसल्या.दरम्यान, आरोपी विकास नेपाळी व त्याचे इतर चार अज्ञात साथीदार यांनी मिळून घरातील मुख्य खोली उघडून घरातील सामान अस्ताव्यस्त करून घरातील मौल्यवान वस्तू व सोन्याचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तसेच विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित व पथक घटनांसाठी दाखल झाले. शहर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.