⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

अंगणवाडीच्या शालेय पोषण आहारामध्ये मृत पाल आढळली ; जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२३ । जळगाव जिल्ह्यातील आसोदा येथे अंगणवाडी मार्फत देण्यात येणाऱ्या सिल बंद शालेय पोषण आहारात मृत पाल आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संबंधित लाभार्थ्यांने जिल्हा परिषद व अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार केली असून प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

नेमका काय आहे प्रकार?
जळगाव जिल्ह्यातील आसोदा येथे अंगणवाडी मार्फत प्रत्येक महिन्याला पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. हे धान्य अंगणवाडी सेवीकांच्या मार्फत गरोदर माता आणि बंळतीण महिलांना देण्यात येते. राज्या शासनाकडून ही योजना जिल्हापरिषदे मार्फत कंत्राटीपद्धतीने राबवण्यात येते. दरम्यान जळगावात देण्यात येणाऱ्या सिल बंद शालेय पोषण आहारात मृत पाल आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

एका लाभार्थ्याला देण्यात आलेल्या पोषण आहारात बंद पाकिटात ही पाल आढळली आहे. याप्रकरणी संबंधित लाभार्थ्यांने जिल्हा परिषद व अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीवरून अन्न व औषध प्रशासनाने हरभरा व मुगाच्या डाळीचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या वतीने ही या प्रकरणी पुरवठा दराची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांनी दिली आहे.