जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२१ । राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे विभागीय आयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या भरारी पथकाने भुसावळ येथे बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना उध्वस्त केला होता. याप्रकरणी जळगाव येथील निरीक्षकांसह चौघांना निलंबीत करण्यात आले आहे.
भुसावळ येथे बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्याची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे भरारी पथकाने दि.१७ जुलै रोजी केली होती. कारवाईत ११ लाख ४६ हजार ७०० रुपयांची दारू पकडल्याच्या पार्श्वभूमीवर भुसावळ येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आय.एन.वाघ, दुय्यम निरीक्षक के.बी.मुळे, जवान एस.एस.निकम व एन.बी.पवार या चौघांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले आहे. राज्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी रात्री हे आदेश जारी केले. दरम्यान, याप्रकरणी अधीक्षक सीमा झावरे यांच्यावरही कारवाईची होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात बनावट दारूचे प्रमाण वाढत असून अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग कानाडोळा करीत असल्याने अनेकांचे फावले होत आहे. चाळीसगाव येथे काही दिवसांपूर्वी बाहेरच्या पथकाने ८४ लाखाची बनावट दारू पकडली होती. बाहेरच्या पथकाने दुसऱ्या जिल्ह्यात कारवाई केली तर त्या जिल्ह्याच्या अधीक्षकासह निरीक्षक व संबंधित कर्मचारी यांना जबाबदार धरून कारवाई करण्याचा इशारा राज्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिला होता. त्यानुसार निलंबनाची कारवाई झाल्याचे बोलले जात आहे. दारू प्रकरणात आणखी किती जणांवर कारवाई होईल हे मात्र पहावे लागणार आहे.