जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२१ । राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या ईडी कोठडी पुन्हा वाढ करण्यात आली आहे. गिरीश चौधरी यांना आता 26 जुलैपर्यंत ईडी कोठडी वाढविली आहे. यापूर्वी १५ जुलै रोजी मुंबईतील पीएमएलए कोर्टानं १९ जुलैपर्यंत चौधरी यांची ईडी कोठडी वाढवली होती. आज सुनावणीदरम्यान ही पुन्हा वाढ करण्यात आली.
दरम्यान, पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. ईडीचा तपास अद्याप पूर्ण न झाल्यामुळे ईडीने पुन्हा एकदा कोठडीची मागणी केली होती. न्यायाझीश एस. एच. गवलानी यांनी गिरीश चौधरी यांच्या कोठडीत वाढ केली आहे.
यापूर्वी झालेल्या सुनावणीत गिरीश चौधरी यांची अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद त्यांचे वकील मोहन टेकावडे यांनी 15 जुलै रोजी कोर्टात केला. या प्रकरणात आम्हाला अनेक साक्षीदार सापडत आहेत. काही साक्षीदार पुढील आठवड्यात ईडीच्या कार्यलयात येणार आहेत. त्यामुळे साक्षीदार आणि आरोपी यांचा आम्हाला समोरासमोर तपास करायचा आहे. त्यामुळे 7 दिवसांची ईडी कोठडी द्यावी, अशी मागणी ईडीचे वकील हितेन वेनेगावकर यांनी कोर्टात केली होती.
गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर ईडीने एकनाथराव खडसे यांनाही समन्स बजावले होते. त्यानंतर ईडीने खडसे यांच आठ तास चौकशी केली. जावई चौधरी यांची कोठडी आणखी वाढवल्यामुळे खडसे यांच्यापुढील अडचणी अद्याप संपल्या नसल्याचे दिसते.