जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२१ । भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटक केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या ईडी कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली. त्यामुळे आता त्यांना १९ जुलैपर्यंत ईडी कोठडीत मुक्काम करावा लागणार आहे. दरम्यान, पुढील तपास आणि अधिक चौकशीसाठी आणखी कोठडी आवश्यक असल्याचे ईडीचे म्हणणे आहे.
गेल्या आठवड्यात जमीन घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर ईडीने एकनाथराव खडसे यांना समन्स जारी करत चौकशीस हजर राहण्याची सूचना केली होती. यावेळी खडसेंची ईडीकडून आठ तास चौकशी करण्यात आली होती.
दरम्यान, या प्रकरणी गिरीश चौधरी यांची अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद त्यांचे वकील मोहन टेकावडे यांनी आज कोर्टात केला. तर या प्रकरणात आम्हाला अनेक साक्षीदार सापडत आहेत. काही साक्षीदार पुढील आठवड्यात ईडीच्या कार्यलयात येणार आहेत. त्यामुळे साक्षीदार आणि आरोपी यांचा आम्हाला समोरासमोर तपास करायचा आहे. त्यामुळे ७ दिवसांची ईडी कोठडी द्यावी, अशी मागणी ईडीचे वकील हितेन वेनेगावकर यांनी कोर्टात केला. त्यानंतर कोर्टाने १९ जुलै पर्यंत म्हणजे ४ दिवसांची ईडी कोठडी दिली. त्यापूर्वी १२ जुलैला मुंबईतील पीएमएलए कोर्टानं १५ जुलैपर्यंत चौधरी यांची ईडी कोठडी वाढवली होती.
काय आहे प्रकरण?
ईडीच्या आरोपानुसार २०१६मध्ये खडसे महसूलमंत्री असताना पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसीच्या मालकीचा भूखंड गिरीश यांच्या नावे विकत घेतला गेला. या भूखंडाचा बाजारभाव ३१ कोटी रुपये असताना खरेदी व्यवहाराच्या नोंदीनुसार गिरीश यांनी तो ३.७५ कोटी रुपयांना विकत घेतल्याची तक्रार आहे. पुण्यातील एका व्यावसायिकाने या व्यवहाराविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीच्या आधारे चौकशी, तपास करून खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी, गिरीश यांच्यासह जागेचे मूळ मालक अब्बार उकाणी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता.
या घडामोडीचा आधार घेत ईडीने समांतर तपास सुरू केला. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ईडीने खडसे कुटुंबीयांविरोधात गुन्हा (ईसीआयआर) नोंदवला होता. डिसेंबर महिन्यात ईडीने खडसे यांना समन्स जारी करत चौकशीस हजर राहण्याची सूचना केली होती. खडसे जानेवारी महिन्यात ईडीसमोर हजर झाले. त्यांची सहा तास चौकशी करण्यात आली होती