जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२१ । देशभरात कोरोनाचा थैमान अद्यापही सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये निर्बंध लावण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, व्यवसायिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
पुढील आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रात निर्बंध शिथील करण्यात येणार असून याबाबत टास्कफोर्सनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अहवाल सादर केला. या आठवड्यात टास्क फोर्स सदस्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. त्यात अहवालावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील लॉकडाऊन १ जून रोजी अनलॉक करण्यात आले होते. परंतु राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हायरसमुळे पुन्हा निर्बंध लावण्यात आले आहे. त्यामुळे आता ‘ओपनिंग अप’चा नारा देऊन राज्य सरकार निर्बंध हटवण्याची तयारी करत आहे. कोणते निर्बंध हटवले जावेत? कुठल्या निर्बंधता शिथिलता आणावी? कार्यालयात किती कर्मचारी असावेत? याबाबतचा अहवाल टास्क फोर्सनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सादर केला आहे.
पहिल्या टप्प्यातील असे असतील नियम?
पहिल्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंट उघडण्यासाठी सवलती जाहीर केल्या जातील. यात रेस्टॉरंट सुरु ठेवण्याची वेळ रात्री 10 पर्यंत केली जाणार आहे. तसंच 50 टक्क्याची मर्यादाही काही प्रमाणात शिथील केली जाण्याची शक्यता आहे. यासाठी हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालेलं असणं गरजेचं आहे.
तसंच लसीकरण झालेल्या ग्राहकांना रेस्टॉरंटमध्ये प्रवेश देण्यात प्राधान्य देण्यासंदर्भात विचार सुरू आहे. शक्य असेल तिथं मोकळ्या जागांमध्ये डायनिंगची व्यवस्था करण्याच्या सूचना हॉटेल व्यवसायिकांना दिल्या जाणार असल्याचीही माहिती मिळतेय. त्याचबरोबर दुकाने सुरू ठेवण्याची वेळही वाढवून दिली जाणार असल्याचं कळतंय. दुकानांमधील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेलं असणं गरजेचं आहे.
असे असेल ‘ऑपनिंग अप’?
– टप्प्याटप्प्याने सर्व आस्थापना सुरू होणार
– लसीकरण पूर्ण झालेल्यांना प्राधान्य
– हॉटेल, रेस्टॉरंटला रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी मिळेल
– दुकानांमधील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण गरजेचे
– सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाचा निर्णय अद्याप नाही