जळगाव जिल्हागुन्हे

बारडोली हत्याकांडाला विमा घोटाळ्याची किनार! चार बडतर्फ पोलीस अन् डॉक्टर रडारवर

जळगाव लाईव्ह न्यूज । गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील बारडोली येथे जळगावच्या पाटील कुटुंबातील पाच जणांची हत्या करून मृतदेह उकाई तलावात फेकल्याच्या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आता या हत्याकांडाचे धागेदोरे जळगाव जिल्ह्यातील कथित विमा फसवणुकीच्या प्रकरणांशी जोडले जात असल्याची माहिती समोर आली आहे. मृत कविता पाटील यांच्याशी संबंधित १० लाख रुपयांच्या कथित विमा फसवणूक प्रकरणात चार बडतर्फ पोलीस कर्मचारी, एका डॉक्टरसह अन्य आरोपींची नावे समोर आल्याने तपासाला वेगळे वळण मिळाले आहे.

बारडोली हत्याकांडातील पाचही मृतदेह सापडले

२३ नोव्हेंबर रोजी सुरतच्या बारडोली पोलीस ठाण्यात या हत्याकांडाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव जिल्ह्यातील पाटील कुटुंबातील पाच जणांची हत्या करून त्यांचे मृतदेह उकाई तलावात फेकण्यात आल्याचे समोर आले. गुजरात पोलिसांनी शोधमोहीम राबवत पाचही मृतदेह बाहेर काढले. यामध्ये प्रथमेश या लहान मुलाचाही मृतदेह सापडला आहे.

या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून, तो जळगाव जिल्ह्यातील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अन्य तीन आरोपी फरार असून, गुजरात आणि जळगाव पोलीस संयुक्तपणे त्यांचा शोध घेत आहेत.

कविता पाटील यांच्याशी संबंधित १० लाखांचा विमा घोटाळा

या हत्याकांडाचा संबंध आता विमा फसवणुकीशी जोडला जात असल्याने तपासाची दिशा अधिक गंभीर झाली आहे. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी मेहूणबारे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात, कविता पाटील यांचे पहिले पती संजय पाटील यांचा अपघाती मृत्यू झाल्याचा खोटा बनाव रचून विमा कंपनीकडून १० लाख रुपये मिळवल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात एकूण १० आरोपींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, बारडोली हत्याकांडातील दोन मृत व्यक्तींचाही या विमा फसवणूक प्रकरणात आरोपी म्हणून समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या दोन्ही घटनांमध्ये नेमका काय संबंध आहे, याचा तपास आता महत्त्वाचा ठरला आहे.

यापूर्वीही विमा फसवणुकीचा गुन्हा

मेहूणबारे पोलीस ठाण्यात ७ मार्च २०२६ रोजी आणखी एका विमा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. राजेंद्र शालीराम जाधव यांचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करून विम्याची रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या प्रकरणात आहे. या गुन्ह्यात एकूण १२ आरोपी असून, त्यापैकी नऊ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दोन्ही विमा फसवणूक प्रकरणांत चार पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. संबंधित चारही कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

यामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र एकनाथ बत्तीसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन अशोक निकम, पोलीस कॉन्स्टेबल सुनील अशोक निकम आणि पोलीस नाईक महेंद्र प्रकाश पाटील यांचा समावेश आहे. हे चारही कर्मचारी आधीच्या विमा फसवणूक प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. नव्या गुन्ह्यातही त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

डॉक्टरसह सात जणांवर कारवाईची शक्यता

नव्या विमा फसवणूक प्रकरणात डॉक्टर मंदार मुकुंद करंबळेकर यांच्यासह सात आरोपींवर कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या सर्वांची कथित विमा फसवणुकीतील भूमिका आणि एकमेकांशी असलेले संबंध तपासले जाणार आहेत.

आता तपासाच्या केंद्रस्थानी नेमकं काय?

बारडोली हत्याकांड, कविता पाटील यांच्याशी संबंधित विमा फसवणूक आणि यापूर्वी दाखल झालेला विमा घोटाळा या तिन्ही प्रकरणांमध्ये काही समान सूत्र आहे का, याचा तपास सुरू आहे. बारडोली हत्याकांडातील आरोपींचा विमा फसवणूक प्रकरणाशी नेमका काय संबंध? आर्थिक व्यवहारांमागे आणखी कोणाचा सहभाग आहे? हत्येमागे विम्याची रक्कम हा काही आर्थिक हेतू होता का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणार आहेत.

सध्या उपलब्ध माहितीनुसार विमा फसवणुकीच्या प्रकरणातील आरोपी आणि बारडोली हत्याकांडातील व्यक्तींमधील संभाव्य संबंध तपास यंत्रणांसाठी महत्त्वाचा धागा ठरत आहे. मात्र दोन्ही घटनांचा थेट संबंध असल्याचे अद्याप अंतिमरीत्या स्पष्ट झालेले नाही. फरार आरोपींच्या अटकेनंतर आणि पुढील तपासातून या संपूर्ण प्रकरणाचे गूढ उकलण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button