जळगाव जिल्हा

जळगावात थंडीचा जोर अचानक ओसरला; ४८ तासांत तापमानात ९ अंशांची वाढ

जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या काही दिवसांपासून हुडहुडी भरवणाऱ्या थंडीने जळगावकरांना आता तात्पुरती विश्रांती दिली आहे. अवघ्या ४८ तासांत किमान तापमानात तब्बल ९ अंश सेल्सिअसची वाढ झाल्याने थंडीचा जोर पूर्णपणे ओसरला आहे. ८ अंशांपर्यंत खाली आलेला तापमानाचा पारा आता थेट १७ अंशांवर पोहोचला आहे. तापमानातील या अचानक बदलामुळे सकाळी आणि रात्री जाणवणारी बोचरी थंडी गायब झाली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या नोंदीनुसार, २३ नोव्हेंबर रोजी जळगावचे किमान तापमान १३.२ अंश सेल्सिअस होते. त्यानंतर मंगळवारी त्यात पुन्हा वाढ होऊन तापमान १७ अंशांवर पोहोचले. विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांत किमान तापमानात झालेली ही वाढ लक्षणीय मानली जात आहे. त्यामुळे सकाळी आणि रात्री जाणवणारी बोचरी थंडी गायब झाली आहे.

दरम्यान, अकवान चक्रीवादळाचे अवशेष उत्तर छत्तीसगड आणि विदर्भाच्या पूर्वेकडील परिसरात कमी दाबाच्या क्षेत्राच्या स्वरूपात सक्रिय आहेत. या हवामान प्रणालीमुळे पूर्वेकडून बाष्प आणि ओलावा असलेले वारे उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. परिणामी जळगाव परिसरात आकाश ढगाळ होत असून, रात्रीच्या वेळी जमिनीतून उष्णता बाहेर पडण्याची प्रक्रिया मंदावली आहे.

यामुळे रात्रीच्या तापमानात अपेक्षित घट होत नसून किमान तापमानात वाढ नोंदवली जात आहे. आगामी काळात हवामानातील बदलांमुळे तापमानात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता असून, नागरिकांचे लक्ष आता हवामानाच्या पुढील स्थितीकडे लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button