
जळगाव लाईव्ह न्यूज । निवृत्तीच्या अवघ्या सात दिवस आधी समाजकल्याण विभागातील तत्कालीन वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता भरत मगन चौधरी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दिव्यांग शाळेतील कंत्राटी सफाईगाराला नियमबाह्य वार्षिक वेतनवाढ देऊन शासनावर आर्थिक भार टाकल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दिव्यांग सक्षमीकरण आयुक्त सत्यजीत बडे यांनी २३ नोव्हेंबर रोजी निलंबनाचे आदेश काढले. विशेष म्हणजे, चौधरी हे ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होणार होते.
जिल्हा परिषद जळगावच्या समाजकल्याण विभागात कार्यरत असताना भरत चौधरी यांनी सावखेडे बुद्रुक येथील श्रवण विकास मंदिर कर्णबधिर विद्यालयातील कंत्राटी सफाईगार समाधान हिवराळे यांना १५ नोव्हेंबर २०१४ रोजीच्या आदेशानुसार जुलै २००७ पासून नियमबाह्य वेतनवाढ लागू केली होती. तसेच सातव्या वेतन आयोगानुसार वेतननिश्चितीचा लाभही दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
या वेतनवाढीसाठी कोणताही शासन निर्णय किंवा सक्षम प्राधिकाऱ्याचा वैध आदेश नसल्याचे चौकशी समितीने स्पष्ट केले. तसेच नियमबाह्य पद्धतीने दिलेल्या जादा रकमेची वसुलीही करण्यात आली नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी तक्रारदाराने २३ मे २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. चौकशी अहवालात नियमबाह्य वेतनवाढ दिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दिव्यांग सक्षमीकरण आयुक्त सत्यजीत बडे यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियमांनुसार भरत चौधरी यांच्या निलंबनाचे आदेश दिले.
निलंबनाच्या कालावधीत चौधरी यांचे मुख्यालय नाशिक येथील जिल्हा परिषद निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, नियमबाह्य वेतनवाढीपोटी दिलेली संपूर्ण रक्कम वसूल करावी आणि या प्रकरणातील संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तक्रारदारांनी कायम ठेवली आहे. सेवानिवृत्तीला अवघे सात दिवस शिल्लक असताना झालेल्या या कारवाईमुळे जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ उडाली आहे.





