गुन्हेपाचोरा

पाचोऱ्यात जमीन व्यवहारातून डॉक्टरचा खून? डोक्यात वार करून मृतदेह बहुळा धरणात फेकला

जळगाव लाईव्ह न्यूज । शेतजमिनीच्या खरेदी-विक्रीच्या आर्थिक व्यवहारातून कन्नड (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील प्रतिष्ठित डॉक्टर व व्यावसायिक डॉ. संजय मनोहर तेली (वय ५२) यांचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे उघडकीस आली आहे. गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या डॉ. तेली यांचा मृतदेह आज (सोमवार, दि. २३) सकाळी ७ वाजेच्या सुमारास बहुळा धरणात आढळून आला. याप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचोरा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत मुख्य संशयित राहुल धर्मराज पाटील आणि त्याच्या सालदारास अटक केली आहे.

डॉ. संजय तेली हे वैद्यकीय व्यवसायासोबतच जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होते. गोराडखेडा येथील राहुल धर्मराज पाटील याची दोन एकर जमीन १ कोटी २ लाख ५० हजार रुपयांना खरेदी करण्याचा व्यवहार ठरला होता. यापोटी डॉ. तेली यांनी पाटील याला ८० लाख रुपयांचा बयाणा (अ‍ॅडव्हान्स) दिला होता.

१७ नोव्हेंबर रोजी डॉ. तेली आपल्या मुलीला जळगाव येथील गोदावरी मेडिकल कॉलेजमध्ये सोडण्यासाठी कन्नड येथून निघाले होते. मुलीला सोडल्यानंतर त्यांनी पिंपळगाव हरेश्वर येथून आपल्या शालकाकडून ५ लाख रुपये घेतले. त्यातील ३ लाख १० हजार रुपये सांगवी (प्र. लोद) येथील घरी ठेवून, उर्वरित १ लाख ९० हजार रुपये घेऊन ते १८ नोव्हेंबर रोजी गोराडखेडा येथे राहुल पाटील याच्याकडे गेले होते.

वादातून डोक्यात घातला लोखंडी रॉड:
जमीन व्यवहाराच्या पैशांवरून डॉ. तेली आणि राहुल पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन राहुल पाटील याने संतापाच्या भरात डॉ. तेली यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात डॉ. तेली यांचा जागीच मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने राहुल पाटील याने आपल्या सालदाराच्या मदतीने मृतदेह एका पोत्यात भरला आणि जवळच असलेल्या बहुळा धरणात फेकून दिला.

शोधमोहीम आणि पोलिसांचा तपास:
१८ नोव्हेंबरपासून डॉ. तेली बेपत्ता असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यांचा शोध घेणाऱ्यांना नातेवाईकांकडून १ लाख २१ हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व पाचोरा पोलिसांनी राहुल पाटील व त्याच्या सालदाराला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

संशयितांनी दिलेल्या कबुलीनंतर रविवारी (दि. २२) सायंकाळी ७ वाजेपासून बहुळा धरणात डॉ. तेली यांच्या मृतदेहाचा शोध सुरू करण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत ही शोधमोहीम सुरू होती. धरणावर नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आरसीपी (RCP) प्लाटूनसह पाचोरा पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अखेर आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास धरणाच्या पाण्यात डॉ. तेली यांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून, पाचोरा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button