जळगाव शहर

जळगाव शहराच्या विकासाला नवी गती देणाऱ्या ‘मिनी रिंग रोड’ चे भूमिपूजन

वाघनगर, पीरबाबा दर्गा आणि गाडगेबाबा चौकाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाला सुरुवात

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील वाहतूक गतिमान करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या शिव कॉलनी स्टॉप ते शंभर फुटी रोडपर्यंतच्या रस्ता विकास प्रकल्पाचे आज मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन पार पडले. संपूर्ण वाघनगर परिसर, पीरबाबा दर्गा तसेच गाडगेबाबा चौकाला जोडणारा हा मार्ग शहरासाठी खऱ्या अर्थाने ‘मिनी रिंग रोड’ ठरणार असून, यामुळे नागरिकांची वाहतुकीची मोठी सोय होणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अधिवेशनादरम्यान शहरातील प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी हा विशेष निधी मंजूर करून घेण्यात आला आहे. या भूमिपूजन सोहळ्याला महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, सभापती चंद्रशेखर पाटील यांच्यासह प्रभाग क्रमांक ११ चे नगरसेवक सिंधूताई कोल्हे, ललित कोल्हे, संतोष पाटील, अमृता सोनवणे तसेच प्रभाग क्रमांक ७ चे नगरसेवक चंद्रशेखर, अंकिता पाटील आणि विशाल भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते.

रस्त्याच्या कामाचा दर्जा टिकून राहावा यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. या मार्गावर ज्या ठिकाणी भूमिगत गटारांचे काम अद्याप बाकी आहे, ते येत्या दोन दिवसांत तातडीने सुरू करण्यात येणार आहे. भूमिगत गटारांचे काम पूर्ण होताच प्रत्यक्ष रस्त्याच्या काँक्रिटीकरण व डांबरीकरणाच्या कामाला वेग दिला जाईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

शहरातील नागरिकांना केवळ रस्ते नव्हे, तर दर्जेदार आणि नियोजनबद्ध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे. शिव कॉलनी ते शंभर फुटी रोड हा मार्ग वाघनगरसह आसपासच्या मोठ्या लोकवस्तीसाठी ‘मिनी रिंग रोड’ म्हणून काम करेल. देवेंद्रजी फडणवीस, गिरीषभाऊ आणि गुलाबभाऊ यांच्या सहकार्यामुळे हा निधी उपलब्ध झाला आहे. भूमिगत गटारांचे उर्वरित काम दोन दिवसांत सुरू करून हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल.

  • राजूमामा भोळे, आमदार, जळगाव शहर

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button