
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढत असून तापमानाचा पारा थेट ८ अंश सेल्सिअसवर घसरला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या एका रात्रीत तापमानात तब्बल ४ अंशांची घसरण झाल्याने यंदाच्या हंगामातील आतापर्यंतच्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. नोव्हेंबर महिन्यातील गेल्या वर्षीचा तापमानाचा विक्रमही यंदा मोडीत निघाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहराचे किमान तापमान १५ ते १७ अंशांच्या दरम्यान, तर कमाल तापमान ३२ ते ३४ अंश सेल्सिअसच्या आसपास होते. मात्र, अचानक हवामानात बदल झाल्याने थंडीने जोरदार पुनरागमन केले आहे. गुरुवारी १२.६ अंशांवर असलेले किमान तापमान शुक्रवारी थेट ८ अंशांपर्यंत खाली आले. त्यामुळे रात्री आणि पहाटेच्या वेळी गारठा अधिक जाणवत आहे.
थंडीचा जोर वाढल्याने नागरिकांनी उबदार कपड्यांचा आधार घेतला असून, शहरातील विविध भागांत शेकोट्या पेटवून नागरिक थंडीपासून बचाव करताना दिसत आहेत. केवळ जळगावच नव्हे, तर धुळे जिल्ह्यातही तापमानाचा पारा नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. दरम्यान, आगामी काही दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना आणखी काही दिवस बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागणार आहे.





