बातम्याजळगाव जिल्हा

रेशन कार्डमध्ये नवीन नाव जोडायचेय? आता घरबसल्या करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!

जळगाव लाईव्ह न्यूज । रेशन कार्डमध्ये कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करण्यासाठी आता सेतू केंद्र किंवा तहसील कार्यालयात वारंवार चकरा मारण्याची गरज राहिलेली नाही. महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने नागरिकांसाठी घरबसल्या ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नवविवाहित पत्नीचे किंवा कुटुंबात नव्याने जन्मलेल्या बाळाचे नाव रेशन कार्डमध्ये समाविष्ट करणे अधिक सोपे झाले आहे.

ऑनलाइन अर्ज कुठे आणि कसा करायचा?

रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करण्यासाठी नागरिकांनी शासनाच्या अधिकृत RCMS पोर्टलला भेट द्यावी. त्यासाठी rcms.mahafood.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी किंवा लॉगिन करावे. त्यानंतर नवीन सदस्याचे नाव जोडण्याचा पर्याय निवडून सध्याचा १२ अंकी रेशन कार्ड क्रमांक टाकावा.

यानंतर नवीन सदस्याचे पूर्ण नाव, जन्मतारीख, आधार क्रमांक आणि कुटुंबप्रमुखाशी असलेले नाते यासह आवश्यक माहिती भरावी. अर्जासोबत संबंधित कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील. सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करून अर्ज ऑनलाइन सबमिट करावा.

कोणती कागदपत्रे आवश्यक?

रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात.

  • मूळ रेशन कार्ड
  • नवीन सदस्याचे आधार कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • लहान मुलाचे नाव समाविष्ट करण्यासाठी जन्म दाखला
  • नवविवाहित महिलेचे नाव समाविष्ट करण्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र
  • माहेरच्या रेशन कार्डमधून नाव कमी केल्याचा दाखला

ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर नागरिकांना अर्ज क्रमांक मिळतो. या अर्ज क्रमांकाच्या माध्यमातून अर्जाची सद्यस्थिती तपासता येते. त्यामुळे अर्ज कोणत्या टप्प्यावर आहे, याची माहिती घेण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची आवश्यकता भासणार नाही.

या ऑनलाइन सुविधेमुळे नागरिकांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचणार असून, रेशन कार्डमधील सदस्यांची नावे समाविष्ट करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे नवविवाहित जोडप्यांसह कुटुंबात नव्या सदस्याचे आगमन झालेल्या नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button