
जळगाव लाईव्ह न्यूज । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या योजनेची e-KYC प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याचे मेसेज आणि काही लिंक मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत. मात्र, शासनाकडून e-KYC प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याबाबत अद्याप कोणतेही नवीन निर्देश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे महिलांनी अशा अनधिकृत लिंकपासून सावध राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अनधिकृत लिंकवरून आर्थिक फसवणुकीचा धोका
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या काही मेसेजमध्ये लाडकी बहीण योजनेची e-KYC पुन्हा सुरू झाल्याचा दावा केला जात आहे. तसेच दिलेल्या लिंकवर क्लिक करून प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले जात आहे. मात्र, या लिंक अधिकृत असल्याची कोणतीही खात्री नसल्याने लाभार्थी महिलांनी त्यावर विश्वास ठेवू नये.
विशेष म्हणजे, अशा अनधिकृत लिंकवर क्लिक करून आधार क्रमांक, बँक खात्याची माहिती, OTP किंवा इतर वैयक्तिक माहिती भरल्यास आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांनी कोणत्याही परिस्थितीत अशा लिंकवर आपली गोपनीय माहिती शेअर करू नये.
अधिकृत सूचना आल्यानंतरच माहिती दिली जाणार
लाडकी बहीण योजनेच्या e-KYC प्रक्रियेबाबत शासनाकडून अधिकृत सूचना प्राप्त झाल्यानंतर जिल्हा महिला व बालविकास कार्यालयामार्फत माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. यासाठी कार्यालयाच्या अधिकृत सोशल मीडिया माध्यमांचा तसेच वृत्तपत्रांचा वापर केला जाईल.
त्यामुळे लाभार्थी महिलांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता केवळ शासनाच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली होणाऱ्या संभाव्य ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी महिलांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.





