
जळगाव लाईव्ह न्यूज । सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून यंदा पावसाने ओढ दिल्याने खरिपाच्या उत्पादनात घट झाली असली, तरी बाजारात सोयाबीनला मिळणाऱ्या वाढीव दरामुळे शेतकऱ्यांना काहीसा आर्थिक दिलासा मिळत आहे. मागणी वाढल्याने जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसह खासगी बाजारात सोयाबीनचे भाव तेजीत असून, २०२१ नंतर प्रथमच सोयाबीनने ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलचा पल्ला ओलांडला आहे.
शासनाने यंदा सोयाबीनसाठी ५ हजार ७०८ रुपये हमीभाव घोषित केला आहे. मात्र, बाजारात असलेली मागणी पाहता, हमीभावापेक्षा तब्बल १ हजार ८०० ते २ हजार रुपये अधिक दर सध्या मिळत आहेत. गेल्या महिनाभरापासून ७ हजार रुपयांवर स्थिर असलेल्या सोयाबीनच्या दरात नुकतीच ५०० रुपयांची वाढ नोंदवली गेली.
उल्लेखनीय म्हणजे, २०२१ मध्ये सोयाबीनने १० हजार रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. त्यानंतर मात्र भाव ४ ते ६ हजारांच्या दरम्यानच रेंगाळले होते. आता पुन्हा एकदा दराने उसळी घेतल्याने कमी उत्पादनामुळे चिंतेत असलेल्या बळीराजाला चांगलाच आर्थिक आधार मिळाला आहे.
भाववाढीचे प्रमुख कारण
यंदा जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातच सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. आधीच सोयाबीनची लागवड कमी होती, त्यात कमी पावसामुळे उत्पादनात मोठी घट झाली. मात्र, दुसरीकडे बाजारात सोयाबीनची मागणी वाढल्याने पुरवठा आणि मागणीच्या गणितानुसार दरात सातत्याने वाढ होत आहे.
उडीद व दादरही तेजीत; शासकीय खरेदी प्रतीक्षेत
सोयाबीनसोबतच इतर शेतमालालाही चांगला भाव मिळत आहेत. बाजारात उडदाचे दर ९ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत, तर दादरला ६ हजार ५०० ते ७ हजार रुपयांचा भाव मिळत आहेत. खासगी बाजारातच शेतकऱ्यांना दमदार दर मिळत असल्याने शेतकरी तिकडेच आपला माल विकण्यास पसंती देत आहेत, परिणामी अद्याप शासकीय खरेदीला सुरुवात होऊ शकलेली नाही.





