
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरासह जिल्ह्यात अखेर गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. काल गुरुवारी किमान तापमानाचा पारा थेट १३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. यंदाच्या हिवाळी हंगामातील हे आतापर्यंतचे सर्वात नीचांकी तापमान ठरले असून सरासरीच्या तुलनेत तब्बल २.३ अंशांनी कमी तापमानाची नोंद झाली आहे.
दरम्यान, शुक्रवारी जळगावच्या किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता असून पारा ११ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे आगामी दिवसांत जळगावकरांना थंडीचा चांगलाच अनुभव येण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी पारा ९.१ अंशांवर
गेल्या वर्षी १२ नोव्हेंबर २०२५ रोजी जळगावात राज्यातील सर्वात कमी ९.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. यंदा त्याच तारखेच्या आसपास किमान तापमान १३ अंशांवर आले आहे. त्यामुळे यंदाच्या हिवाळ्यातही तापमानात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आठवडाभर हवामान कोरडे
पुढील सात दिवसांच्या हवामान अंदाजानुसार, जळगाव जिल्ह्यात आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून पावसाची शक्यता नाही. कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.
त्यामुळे दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री तसेच पहाटे गारवा, असे परस्परविरोधी वातावरण जळगावकरांना अनुभवायला मिळणार आहे. किमान तापमानात आणखी घट झाल्यास पहाटेच्या वेळी थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.





