
जळगाव लाईव्ह न्यूज । दुष्काळाच्या परिस्थितीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा संदेश देण्यासाठी राज्यातील मंत्र्यांनी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. याच उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील बंजारा समाजबहुल पोखरी तांडा येथे ग्रामस्थांसोबत दिवाळीचा आनंद साजरा केला.
दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी राज्यातील मंत्री ग्रामीण भागात जाऊन शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. त्यानुसार मंत्री गिरीश महाजन यांनी यावल तालुक्यातील बोरमाळी येथे आपल्या परिवारासह दिवाळी साजरी केली, तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोखरी तांडा गावाला भेट देत ग्रामस्थांसोबत सणाचा आनंद वाटून घेतला.
पारंपरिक पद्धतीने पालकमंत्र्यांचे स्वागत
पोखरी तांडा येथे आगमन झाल्यानंतर गावातील महिलांनी गुलाबराव पाटील यांचे औक्षण करून पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. यावेळी महिलांनी पारंपरिक गाणी सादर केली. गावातील नागरिकांनीही उत्साहाने या दिवाळी सोहळ्यात सहभाग घेतला.
ग्रामस्थांसोबत एकाच ताटात फराळ
या भेटीदरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ग्रामस्थांसोबत एकाच थाळीत बसून दिवाळीचा फराळ केला. मंत्री आणि ग्रामस्थ एकत्र बसून फराळाचा आनंद घेत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत सण साजरा करण्याच्या या उपक्रमातून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दिवाळीसारख्या आनंदाच्या सणात ग्रामीण भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांसोबत वेळ घालवत पालकमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. पोखरी तांडा येथील या दिवाळी सोहळ्याची परिसरात चर्चा सुरू आहे.





