जळगाव जिल्हाभुसावळ

भाऊबीजेसाठी दोन दिवस भुसावळ-देवळाली विशेष मेमू धावणार; पाहा वेळापत्रक

जळगाव लाईव्ह न्यूज । दिवाळी आणि भाऊबीजेच्या सणानिमित्त रेल्वेने भुसावळ ते देवळालीदरम्यान अनारक्षित विशेष मेमू गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. १० आणि ११ नोव्हेंबर रोजी या गाडीच्या एकूण चार फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे जळगावसह खान्देशातील प्रवाशांना नाशिकच्या दिशेने प्रवास करण्यासाठी अतिरिक्त सुविधा मिळणार आहे.

दिवाळीच्या सुट्ट्या आणि भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर नियमित रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली आहे. अनेक गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने १२ डब्यांची अनारक्षित विशेष मेमू गाडी उपलब्ध करून दिली आहे.

असे असेल विशेष मेमूचे वेळापत्रक

गाडी क्रमांक ०१२२६ भुसावळ-देवळाली विशेष मेमू १० आणि ११ नोव्हेंबर रोजी भुसावळहून सकाळी ९.१५ वाजता सुटणार असून दुपारी १.०५ वाजता देवळाली येथे पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१२२५ देवळाली-भुसावळ विशेष मेमू त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता देवळालीहून सुटेल आणि सायंकाळी ५ वाजता भुसावळला पोहोचेल.

जळगावसह प्रमुख स्थानकांवर थांबा
या विशेष मेमूला जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव आणि नाशिक रोड या प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना नाशिकच्या दिशेने जाण्यासाठी अतिरिक्त रेल्वेसेवा उपलब्ध होणार आहे.

विशेष गाडी अनारक्षित असल्याने आरक्षणाची अडचण असलेल्या प्रवाशांनाही प्रवासाची संधी मिळणार आहे. गाडीचे थांबे आणि वेळापत्रकातील संभाव्य बदल जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी रेल्वेचे अधिकृत संकेतस्थळ किंवा एनटीईएस (NTES) ॲपवर माहिती तपासावी, असे आवाहन भुसावळ रेल्वे प्रशासनाने केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button