सोने - चांदीचा भाव

दिवाळीच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदीचा विचार करताय? पाहा जळगावातील आजचे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने जळगावच्या सराफ बाजारात आज सकाळपासूनच ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीची पूजा करण्याची परंपरा असल्याने नागरिकांनी सोन्या-चांदीच्या वस्तू खरेदीला पसंती दिली. विशेषतः लक्ष्मीच्या मूर्ती, सोन्या-चांदीचे शिक्के आणि पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात मोठी लगबग दिसून आली.

सोने खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या सुवर्ण बाजारात सणानिमित्त उत्साहाचे वातावरण होते. घराघरांत धनाची देवता लक्ष्मीची पूजा करून सुख, समृद्धी आणि भरभराटीची प्रार्थना केली जाते. या पूजेसाठी सोन्या-चांदीच्या वस्तूंना विशेष महत्त्व असल्याने अनेक नागरिकांनी आपल्या बजेटनुसार खरेदी करण्यासाठी सराफ दुकानांकडे धाव घेतली.

सोने-चांदीचे आजचे दर काय?

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जळगावच्या सराफ बाजारात २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १ लाख ३० हजार ७० रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४२ हजार रुपये इतका होता. त्याचबरोबर चांदीचा भाव प्रतिकिलो १ लाख ८८ हजार रुपये नोंदविण्यात आला.

चांदीच्या लक्ष्मी मूर्ती आणि शिक्क्यांना पसंती

ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन सराफ व्यावसायिकांनी विविध प्रकारच्या सोन्या-चांदीच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. सोन्याचे छोटे तुकडे, महालक्ष्मीचे शिक्के, चांदीच्या लक्ष्मीच्या मूर्ती, चांदीचे शिक्के तसेच विविध डिझाइनमधील दागिन्यांनी दुकानांची शोभा वाढवली आहे. यंदा विशेषतः चांदीच्या लक्ष्मी मूर्ती आणि शिक्के खरेदी करण्याकडे ग्राहकांचा अधिक कल दिसून आला.

अनेक नागरिकांनी आपल्या आर्थिक क्षमतेनुसार सोन्या-चांदीच्या वस्तूंची खरेदी केली. त्यामुळे सकाळपासूनच सराफ दुकानांमध्ये ग्राहकांची वर्दळ सुरू होती. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने जळगावच्या सुवर्ण बाजारात झालेली गर्दी आणि खरेदीचा उत्साह पाहता नागरिकांनी परंपरेला यंदाही तितकेच महत्त्व दिल्याचे चित्र दिसून आले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button