
जळगाव लाईव्ह न्यूज । दिवाळीच्या सणात सोने-चांदी खरेदीचे नियोजन करणाऱ्या ग्राहकांना पुन्हा एकदा महागाईचा झटका बसला आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सराफा बाजारात मोठी दरवाढ झाली आहे. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ७०० रुपयांची, तर चांदीच्या दरात प्रति किलो २ हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.
राज्यातील महत्त्वाच्या सराफा बाजारांपैकी एक असलेल्या जळगावमध्ये सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी पाहायला मिळत आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आज दरवाढीनंतर २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख ४२ हजार रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी काल सोन्याचा दर १ लाख ४१ हजार ३०० रुपये इतका होता. मात्र आज त्यात वाढ झाली.
दुसरीकडे सोन्यासोबत चांदी दरातही मोठी वाढ झाली. चांदीचा दर प्रति किलो १ लाख ८८ हजार रुपयावर पोहोचला आहे. काल चांदीचा दर १ लाख ८६ हजार रुपये इतका होता. आज त्यात दोन हजाराची वाढ झाली.
दिवाळीच्या काळात सोने-चांदी खरेदीला विशेष महत्त्व असते. त्यातच सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने दागिन्यांच्या खरेदीसाठी ग्राहक सराफा बाजारात येत आहेत. मात्र, दररोज बदलणाऱ्या किमती आणि अचानक होणारी दरवाढ यामुळे ग्राहकांना खरेदीचा निर्णय घेताना विचार करावा लागत आहे. रविवारच्या सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता असताना त्याच्या आदल्याच दिवशी सोन्या-चांदीचे दर वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला चांगलाच फटका बसला आहे.
दिवाळीच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांना आता वाढलेल्या दरांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आगामी दिवसांत सराफा बाजारातील दर कोणते वळण घेतात, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.




