
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे काही दिवसांपूर्वी जळगावात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता ढगाळ वातावरण दूर होऊन पुन्हा उन्हाचा चटका वाढला आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिवसा कडक ऊन जाणवत असून, रात्री आणि पहाटेच्या वेळी मात्र थंडीचा गारवा अनुभवायला मिळत आहे. शुक्रवारी, ६ नोव्हेंबर रोजी किमान तापमान १४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामानाच्या अंदाजानुसार, ६ नोव्हेंबर रोजी जळगावचे किमान तापमान १४ अंशांपर्यंत खाली येऊ शकते. त्यानंतर ७ ते ९ नोव्हेंबरदरम्यान किमान तापमान १५ अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. तर १० नोव्हेंबर रोजी तापमानात किंचित वाढ होऊन ते १७ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, या कालावधीत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिर राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दिवस आणि रात्रीच्या तापमानात तब्बल १९ ते २० अंशांची तफावत निर्माण होऊ शकते. परिणामी, पहाटे थंडीचा गारवा तर दुपारच्या वेळी उन्हाचा तीव्र चटका, असे संमिश्र वातावरण जळगावकरांना अनुभवायला मिळणार आहे.
दरम्यान, गुरुवारी जळगावचे किमान तापमान १९.७ अंश, तर कमाल तापमान ३४.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तीन दिवसांपूर्वी दिवस आणि रात्रीच्या तापमानातील तफावत १५ अंशांच्या आसपास होती. त्यानंतर रात्रीच्या तापमानात पुन्हा वाढ झाली होती. मात्र, आता किमान तापमानात पुन्हा घट होण्याचा अंदाज असल्याने पहाटेच्या थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.
एकूणच जळगाव जिल्ह्यात सध्या हवामानाचा लहरीपणा कायम असून, दिवसा उन्हाचा तडाखा आणि रात्री थंडीचा गारवा असे दुहेरी चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी सकाळी व रात्री बाहेर पडताना थंडीपासून बचावासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.





