जळगाव जिल्हा

जळगावकरांनो, स्वेटर बाहेर काढा! ‘या’ तारखेनंतर थंडीचा कडाका वाढणार, पारा थेट..

जळगाव लाईव्ह न्यूज । ऑक्टोबर महिना संपून नोव्हेंबर सुरू झाला, तरी जळगावमध्ये अपेक्षित थंडी जाणवत नसल्याने नागरिकांना गारव्याची प्रतीक्षा आहे. मात्र, आता वातावरणात बदल होण्याचे संकेत मिळत आहे. ६ नोव्हेंबरपासून जळगाव शहरासह जिल्ह्यात थंडीचा प्रभाव जाणवू लागणार आहे. १० नोव्हेंबरनंतर थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता असून, रात्रीचे तापमान १३ ते १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे.

यंदा ऑक्टोबर महिन्यात थंडीचा जोर अपेक्षेप्रमाणे वाढला नाही. महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात केवळ एकाच दिवशी किमान तापमान १५ अंशांपर्यंत घसरले होते. त्यानंतर बहुतांश दिवसांत रात्रीचे तापमान १८ ते २१ अंशांच्या आसपास नोंदवले गेले. त्यामुळे नोव्हेंबर सुरू होऊनही जळगावकरांना थंडीची प्रतीक्षा करावी लागत होती.

बंगालच्या उपसागरात सलग निर्माण झालेली दोन चक्रीवादळे आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील हवामान प्रणालीमुळे राज्यातील थंडीच्या आगमनावर परिणाम झाला. या प्रणालींमुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह विस्कळीत झाला होता. परिणामी, जळगाव जिल्ह्यात तापमानात अपेक्षित घट झाली नाही.

२ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. ३ नोव्हेंबरला हवामान कोरडे राहिले. तर ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी अंशतः ढगाळ वातावरणासह कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर ६ नोव्हेंबरपासून चक्रीवादळांचा प्रभाव कमी होऊन वातावरणात बदल होण्याची अपेक्षा आहे.

रात्रीच्या तापमानात मोठी घसरण होणार

हवामान पुन्हा कोरडे झाल्यानंतर उत्तरेकडून थंड वारे जळगावच्या दिशेने वाहण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे ६ नोव्हेंबरपासून रात्रीच्या तापमानात हळूहळू घट होण्यास सुरुवात होईल. विशेषतः १० नोव्हेंबरनंतर थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या काळात रात्रीचा पारा १३ ते १५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरू शकतो. नोव्हेंबर महिन्यात रात्रीचे सरासरी तापमान १४ अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.

एल निनोचा प्रभाव असला तरी थंडीचा अनुभव येणार

यंदा एल निनोच्या प्रभावामुळे हिवाळ्यात थंडीचे प्रमाण तुलनेने कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, त्याचा अर्थ थंडी पूर्णपणे गायब होईल असा नाही. आगामी १५ दिवसांत उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना रोखणारी अन्य हवामान प्रणाली निर्माण होण्याची शक्यता कमी असल्याने जिल्ह्यात थंडीचा प्रभाव कायम राहू शकतो. त्यामुळे आतापर्यंत रात्री जाणवणारा सौम्य गारवा आता अधिक तीव्र होणार असून, जळगावकरांना लवकरच स्वेटर आणि उबदार कपडे बाहेर काढावे लागणार आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button