जळगाव जिल्हा

दिवाळीत पाऊस की थंडी? जळगावच्या हवामानाचा नवा अंदाज; ‘या’ तारखांपासून वाढणार गारवा

जळगाव लाईव्ह न्यूज । दिवाळीचा सण तोंडावर आला असताना जळगाव जिल्ह्यातील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘मुरासू’ चक्रीवादळामुळे राज्यातील हवामानावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातही काही दिवस ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाची शक्यता आहे. मात्र, हा पाऊस किरकोळ स्वरूपाचा राहण्याचा अंदाज असून दिवाळीनंतर तापमानात घट होऊन थंडीचा प्रभाव वाढू शकतो.

जळगाव जिल्ह्यात आज २ ते ५ नोव्हेंबरदरम्यान कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १७ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. या काळात हवेत बाष्पाचे प्रमाण वाढल्याने काही वेळ ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते. तसेच जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची किरकोळ शक्यताही वर्तवण्यात आली आहे.मात्र, संभाव्य पावसाचा फारसा प्रभाव जाणवणार नसल्याचा अंदाज आहे. त्यामुळे दिवसा उबदार वातावरण, तर रात्री तुलनेने गारवा अशी स्थिती अनुभवायला मिळू शकते.

दिवाळीत रात्री गारवा, दिवसा उबदार वातावरण

५ नोव्हेंबरनंतर जळगाव जिल्ह्यातील वातावरण अधिक स्वच्छ होण्याची शक्यता आहे. धनत्रयोदशीपासून ते ८ नोव्हेंबरपर्यंत किमान तापमान १६ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहू शकते. त्यामुळे दिवाळीच्या काळात रात्री आणि पहाटे गारवा जाणवेल, तर दिवसा तुलनेने उबदार वातावरण राहण्याची शक्यता आहे.

१२ ते १५ नोव्हेंबरदरम्यान थंडी वाढणार?

दिवाळीनंतर जळगाव जिल्ह्यात थंडीचा प्रभाव हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः १२ ते १५ नोव्हेंबरदरम्यान किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने घट झाल्यास पहाटे आणि रात्री अधिक गारवा जाणवू शकतो.गेल्या काही दिवसांपासून जाणवणारा उकाडा कमी होऊन वातावरणात हिवाळ्याची चाहूल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून नागरिकांना थंडीचा अनुभव येऊ शकतो.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button