गुन्हेअमळनेर

अमळनेरमध्ये वाळू माफियांनी शेतकऱ्याला डंपरखाली चिरडले! चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांचा धुमाकूळ थांबण्याचे नाव घेत नाहीये! अशातच अमळनेर तालुक्यातील नांद्री गावाजवळ जुन्या वादातून एका शेतकऱ्याला डंपरखाली चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शरद रतन पाटील असे मृत ग्रामस्थाचे नाव असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत त्यांचे दोन्ही पाय गंभीररीत्या चिरडले गेले होते. उपचारांपूर्वीच किंवा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विपुल किरण गोसावी, मयूर अनिल बोरसे, सागर संजय गोसावी आणि भरत सुभाष पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी या घटनेत वापरलेला डंपर जप्त केला असून, डंपर चालकाला अटक केली आहे.

अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारीवरून वाद?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अवैध वाळू वाहतुकीबाबत तक्रार केल्याच्या कारणावरून शरद पाटील आणि संशयित आरोपींमध्ये जुना वाद होता. याच वादातून त्यांना डंपरने चिरडल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

विशेष म्हणजे, घटनेच्या तीन दिवसांपूर्वीच संशयित आरोपींनी शरद पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर आता त्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

अमळनेर पोलिसांकडून तपास सुरू

या घटनेनंतर पोलिसांनी डंपर जप्त करून चालकाला अटक केली आहे. अवैध वाळू वाहतुकीला विरोध केल्यामुळे हा प्रकार घडला का, तसेच या घटनेत इतर संशयितांची नेमकी भूमिका काय होती, याचा तपास अमळनेर पोलीस करत आहेत. या प्रकरणातील पुढील तपासातून घटनेमागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button