नोकरी संधी

सर्वोच्च न्यायालयात सरकारी नोकरीची मोठी संधी! तब्बल २ लाखांपर्यंत मिळणार पगार

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी विशेष । तुम्हीही देशाच्या सर्वोच्च न्यायालयात सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सुप्रीम कोर्टात कोर्ट मास्टर पदाच्या २० जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना तब्बल २ लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

कोणाला करता येणार अर्ज?

सर्वोच्च न्यायालयाकडून कोर्ट मास्टर (शॉर्टहँड) पदाच्या एकूण २० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शॉर्टहँड आणि इतर आवश्यक कौशल्यांशी संबंधित पात्रता पूर्ण करणे गरजेचे आहे. उमेदवारांचे वय ३० ते ४५ वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.

किती मिळणार पगार?

या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्स लेव्हल ११ नुसार वेतन मिळणार आहे. यामध्ये सुरुवातीचे वेतन ६७ हजार ७०० रुपये असून, कमाल वेतन २ लाख ८ हजार ७०० रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे आकर्षक वेतनासह सर्वोच्च न्यायालयात काम करण्याची संधी उमेदवारांना मिळणार आहे.

ऑनलाइन अर्ज कसा कराल?

इच्छुक उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

वेबसाइटवरील Recruitment विभागात जा.

Court Master Recruitment या भरतीची अधिकृत अधिसूचना उघडा.

अर्जाच्या लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरा.

शैक्षणिक कागदपत्रे आणि आवश्यक प्रमाणपत्रे अपलोड करा.

अर्जातील सर्व माहिती तपासून अर्ज सबमिट करा.

अर्जाची पावती किंवा प्रिंटआउट भविष्यातील संदर्भासाठी जतन करून ठेवा.

१५ नोव्हेंबर अर्जाची शेवटची तारीख

सर्वोच्च न्यायालयातील कोर्ट मास्टर पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली भरती अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी आणि पात्रता, आवश्यक कौशल्ये तसेच अर्जासंदर्भातील सर्व अटी तपासून घ्याव्यात.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button