
जळगाव लाईव्ह न्यूज । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. सप्टेंबर महिना लोटल्यानंतर आता ऑक्टोबर महिना संपायलाही अवघे काही दिवस उरले आहेत. यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते बँक खात्यात कधी जमा होणार, याकडे राज्यातील लाडक्या बहिणींचे डोळे लागले आहेत.
दरम्यान, सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारने ३४४.६२ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीपूर्वी पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारने सप्टेंबर महिन्याच्या निधी वितरणाला मंजुरी दिली असली, तरी महिलांना सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे मिळून एकाच वेळी ३ हजार रुपये मिळणार, की केवळ सप्टेंबर महिन्याचे १ हजार ५०० रुपये जमा होणार, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, सध्या समोर आलेल्या निधी मंजुरीच्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे.
त्यामुळे लाभार्थी महिलांना सुरुवातीला केवळ सप्टेंबर महिन्याचे १ हजार ५०० रुपये मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी वितरित होणार, याबाबत स्वतंत्र अधिकृत घोषणा झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल.
दिवाळीपूर्वी पैसे जमा होणार?
दिवाळीचा सण जवळ आल्याने लाडक्या बहिणींना हप्त्याचे पैसे सणापूर्वी मिळण्याची अपेक्षा आहे. या रकमेमुळे महिलांना दिवाळीची खरेदी आणि घरखर्चासाठी आर्थिक मदत मिळू शकते. मात्र, सप्टेंबरच्या हप्त्याची रक्कम नेमकी कोणत्या दिवशी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार, याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे महिलांनी सरकारच्या अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.





