
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाळू वाहतुकीविरोधात कासोदा पोलिसांसह महसूल विभागाने संयुक्त कारवाई करत मोठा दणका दिला आहे. या कारवाईत चार वाहने आणि त्यातील एकूण ७६ ब्रास वाळूसह तब्बल ३२ लाख ५८ हजार २०७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच अवैधरीत्या साठवून ठेवलेला ६० ब्रास वाळूचा साठाही जप्त करून एरंडोल तहसील कार्यालयात हलविण्यात आला आहे. ही कारवाई २५ आणि २६ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.
उत्राण आणि करदन शिवारात कारवाई
जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच संबंधित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई करण्यात आली. उत्राण गावाच्या वेशीजवळ, मारोती मंदिराजवळ तसेच करदन शिवारातील गिरणा नदीपात्र परिसरात वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी वाहने आढळून आली.
चार वाहनांसह ७६ ब्रास वाळू जप्त
२५ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ११ वाजता टाटा कंपनीचे आयशर वाहन क्रमांक MH-18 BG-7208 आढळून आले. या वाहनात अंदाजे ५ ब्रास वाळू होती. या कारवाईत सुमारे ६ लाख २३ हजार ६२९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
२५ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १.३० वाजता चॉकलेटी रंगाचे आयशर वाहन क्रमांक MH-20 GC-9147 आढळून आले. या वाहनात अंदाजे २ ब्रास वाळू होती. या कारवाईत ६ लाख ९ हजार १४९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
२६ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १ वाजता टाटा कंपनीचा डंपर क्रमांक MH-18 CB-1120 आढळून आला. या वाहनात अंदाजे ८ ब्रास वाळू होती. या प्रकरणात सुमारे ८ लाख ३७ हजार ६५६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
२६ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे २ वाजता टाटा कंपनीचा डंपर क्रमांक MH-18 AG-4513 आढळून आला. या वाहनात अंदाजे १ ब्रास वाळू होती. या प्रकरणात ६ लाख ४ हजार ७७३ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या चारही कारवायांमध्ये एकूण ७६ ब्रास वाळूसह ३२ लाख ५८ हजार २०७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलिसांच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
अवैध वाळूसाठाही जप्त
वाहनांमधून वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासोबतच अवैधरीत्या साठवून ठेवलेला सुमारे ६० ब्रास वाळूचा साठाही जप्त करण्यात आला. हा वाळूसाठा एरंडोल तहसील कार्यालयात हलविण्यात आला आहे. या प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कासोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलीस कर्मचारी आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.





