जळगाव जिल्हाहवामान

महाबळेश्वरपेक्षाही जळगाव थंड! पारा घसरून १५ अंशांवर; वाचा पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या महिन्याभरापासून ‘ऑक्टोबर हीट’च्या कडाक्याने आणि घामाघूम करणाऱ्या उकाड्याने त्रस्त झालेल्या जळगावकरांना अखेर गुलाबी थंडीची सुखद चाहूल लागली आहे. मागच्या २४ तासात जळगावच्या तापमानात मोठी घट नोंदवली गेली. ज्यामुळे यंदाच्या हंगामातील नीचांकी १५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विशेष म्हणजे, या वेळी राज्याचे हवेशीर व थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरचे तापमान १७ अंश सेल्सिअस होते, म्हणजेच महाबळेश्वरपेक्षाही जळगावचा पारा २ अंशांनी खाली घसरल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व आनंदाचे वातावरण आहे.

गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा ३७ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत होता. त्यामुळे दिवसा उन्हाचा कडाका आणि रात्री उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागत होता. मात्र, ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वातावरणात बदल होण्यास सुरुवात झाली आहे.सोमवारी (२६ ऑक्टोबर) जळगावचे कमाल तापमान ३४.५ अंश तर किमान तापमान १५.४ अंश सेल्सिअसपर्यंत होते.

थंडी वाढण्याचे कारण?

हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार, उत्तर भारतातील कोरड्या हवामानामुळे उत्तरेकडून थंड वारे वाहू लागले आहेत. याचा परिणाम जळगावच्या तापमानावर झाला असून, रात्रीच्या पाऱ्यात घट झाली आहे. पहाटेच्या वेळी हवेत गारवा जाणवू लागल्याने नागरिकांना थंडीचा अनुभव मिळत आहे. दिवसाच्या तापमानातही घट झाल्याचं दिसून येत आहे. जर हे कोरडे हवामान कायम राहिले, तर येत्या काळात थंडीचा कडाका आणखी वाढू शकतो.

मात्र, दुसरीकडे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे या सुखद थंडीला काहीसा ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे बाष्पयुक्त वारे आंध्र प्रदेश, ओडिशा मार्गे छत्तीसगड आणि विदर्भाच्या दिशेने सरकणार असल्याने, आगामी काही दिवस जळगावात ढगाळ वातावरण राहून काही प्रमाणात पावसाची हजेरीही लागू शकते.

यंदाच्या हिवाळ्यात जळगाव जिल्ह्यात थंडीचे प्रमाण तुलनेने कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. एल निनोच्या प्रभावामुळे समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानात वाढ होऊ शकते. त्याचा परिणाम मान्सूनसोबतच हिवाळ्यातील हवामानावरही होण्याची शक्यता असते.

जळगावचे पुढील पाच दिवसांचे हवामान कसे असेल?

तारीखरात्रीचे तापमानदिवसाचे तापमानसंभाव्य हवामान
२७ ऑक्टोबर१५° C३६° Cमुख्यतः कोरडे
२८ ऑक्टोबर१६° C३६° Cढगाळ; काही प्रमाणात पावसाची शक्यता
२९ ऑक्टोबर१७° C३३° Cढगाळ; काही प्रमाणात पावसाची शक्यता
३० ऑक्टोबर१७° C३४° Cढगाळ; काही प्रमाणात पावसाची शक्यता
३१ ऑक्टोबर१६° C३३° Cढगाळ; काही प्रमाणात पावसाची शक्यता

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button