
जळगाव लाईव्ह न्यूज । मध्य प्रदेशात आयोजित सत्संग कार्यक्रमासाठी जात असलेल्या भुसावळ तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या ४०७ मालवाहू वाहनाचा कानळदा रोडवर भीषण अपघात झाला. बडे जटाधारी बाबा महादेव मंदिराजवळ वाहनाच्या मागील चाकाचा एक्सल तुटल्याने वाहन दोन वेळा पलटी झाले. या अपघातात महिला, पुरुष आणि लहान मुलांसह १९ जण जखमी झाले असून, त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एक्सल तुटल्याने वाहन पलटी
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील वराड सिम, कुऱ्हा, मोंढाळा, खंडाळा, सिंधी आणि मांडवा परिसरातील आदिवासी बांधव मध्य प्रदेशात आयोजित सत्संग कार्यक्रमासाठी ४०७ मालवाहू वाहनातून प्रवास करत होते. दरम्यान, कानळदा रोडवरील बडे जटाधारी बाबा महादेव मंदिराजवळ वाहनाच्या मागील चाकाचा एक्सल अचानक तुटला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन दोन वेळा पलटी झाले.
१९ जण जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. जखमींना रुग्णवाहिका तसेच खासगी वाहनांच्या मदतीने तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचा समावेश असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते का?
या अपघातामुळे मालवाहू वाहनातून प्रवाशांची वाहतूक करण्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ४०७ वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते का, तसेच वाहनाची तांत्रिक स्थिती कशी होती, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. अपघाताच्या नेमक्या कारणांचा आणि वाहनातील प्रवाशांच्या संख्येचा तपास होणे आवश्यक आहे.





