जळगाव शहरराजकारण

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले! पहा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम..

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचा बिगूल वाजला असून, २१ जागांसाठी २९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे; तर ३० नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. दरम्यान, सलग दहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या दहा संचालकांना निवडणूक लढविता येणार नसल्याने राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

२६ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार

निवडणूक कार्यक्रमानुसार, २६ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून अर्जांची छाननी केली जाईल. त्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेपासून उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ३ ते १७ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३० नोव्हेंबर रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर होईल.

दहा दिग्गजांना निवडणूक लढविता येणार नाही?

नव्या सहकारी तरतुदीनुसार, सलग दहा वर्षांचा संचालकपदाचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या संचालकांना निवडणूक लढविता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे विद्यमान चेअरमन संजय पवार, संचालक तथा आमदार अनिल भाईदास पाटील, आमदार किशोर पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील, आमदार अमोल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, अॅड. रवींद्र पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, माजी मंत्री एकनाथ खडसे आणि माजी चेअरमन अॅड. रोहिणी खडसे या दहा दिग्गजांना निवडणूक लढविता येणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

या नेत्यांना निवडणुकीत सहभागी होता येणार नसल्याने नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच विविध राजकीय पक्षांना आपापले समर्थक उमेदवार पुढे करण्यासाठी नव्याने रणनीती आखावी लागणार आहे.

सर्वपक्षीय पॅनल की महायुती? राजकीय वर्तुळात चर्चा

जिल्हा बँकेच्या मागील निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलची रचना करण्यात आली होती. मात्र, राज्यातील राजकीय परिस्थितीत झालेल्या बदलांमुळे यंदाच्या निवडणुकीत कोणते समीकरण आकाराला येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बदललेल्या राजकीय समीकरणांचा परिणाम जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरही होण्याची शक्यता आहे. यंदा महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविली जाणार की पुन्हा सर्वपक्षीय पॅनलची मोट बांधली जाणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाल्यानंतर राजकीय हालचालींना अधिक वेग येण्याची शक्यता असून, जिल्हा बँकेच्या सत्तेची गणिते कोणाच्या बाजूने झुकणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

जिल्हा बँक निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम

उमेदवारी अर्ज दाखल: २६ ते ३० ऑक्टोबर

अर्जांची छाननी: २ नोव्हेंबर

उमेदवारांची यादी प्रसिद्ध: ३ नोव्हेंबर

उमेदवारी अर्ज माघारी: ३ ते १७ नोव्हेंबर

अंतिम उमेदवार यादी: १८ नोव्हेंबर

मतदान: २९ नोव्हेंबर

मतमोजणी व निकाल: ३० नोव्हेंबर

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या निवडणुकीत २१ जागांसाठी कोण उमेदवारी दाखल करणार, कोणत्या पक्षांचे पॅनल एकत्र येणार आणि सत्तेची सूत्रे कोणाकडे जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button