गुन्हेजळगाव शहर

जळगावात पुन्हा खळबळ! नशेसाठी पैसे न दिल्याने प्रौढावर धारदार शस्त्राने हल्ला

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात किरकोळ कारणावरून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सतत वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत असून अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नशा करण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून ४५ वर्षीय व्यक्तीवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. ही थरारक घटना जळगाव शहरालगत असलेल्या खेडी गावाजवळ आज शुक्रवारी, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. किशोर मधुकर बाविस्कर असं जखमी झालेल्याचे नाव असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

काय आहे घटना?

किशोर बाविस्कर हे खेडी येथील शिवनगर परिसरात राहतात. भंगार विक्रीचा व्यवसाय करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी आनंद पाटील, गौरव पाटील, सनी (पूर्ण नाव समजू शकलेले नाही) आणि अन्य एका व्यक्तीने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. मात्र, बाविस्कर यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला. याच वादातून रात्री उशिरा त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे.

दुसऱ्या दिवशी पुन्हा वाद, धारदार शस्त्राने वार

आज शुक्रवारी सकाळी संशयितांनी पुन्हा बाविस्कर यांच्याकडे पैशांची मागणी केल्याचे सांगण्यात येते. यावेळीही त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने वाद वाढला. त्यानंतर तीन ते चार जणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात त्यांच्या कमरेवर, पाठीवर आणि हातावर वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले.

हल्ल्याची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्रपरिवाराने घटनास्थळी धाव घेतली. जखमी बाविस्कर यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. हल्ल्यातील संशयितांची भूमिका, वादाचे नेमके कारण आणि घटनेचे इतर तपशील पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहेत. खेडी गावाजवळ घडलेल्या या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button