जळगाव जिल्हागुन्हेजळगाव शहर

जळगाव जवळील बांभोरी पुलावरील भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहराजवळील गिरणा नदीवरील बांभोरी पुलावर कार आणि कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात झुरखेडा (ता. धरणगाव) येथील तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पंकज प्रकाश चौधरी (वय ३०), रवींद्र अरुण चौधरी (वय ३०) आणि हरीश हिम्मत चौधरी (वय ३२, सर्व रा. झुरखेडा, ता. धरणगाव) असं मृतांचा समावेश आहे. आतेभावाला जळगाव येथे सोडून गावी परतत असताना या तरुणांवर काळाने घाला घातला. या घटनेमुळे झुरखेडा गावावर शोककळा पसरली असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र चौधरी आणि हरीश चौधरी यांच्या काकांचा रविवारी झुरखेडा येथे दशक्रिया विधी होता. यानिमित्ताने नातेवाईक गावात आले होते. विधी आटोपल्यानंतर रवींद्र आणि हरीश हे दोघे चुलत भाऊ आपल्या आतेभावाला सोडण्यासाठी कारने जळगाव येथे आले होते.

आतेभावाला जळगाव येथे सोडल्यानंतर रवींद्र आणि हरीश यांच्यासोबत पंकज चौधरी हे तिघे कारने झुरखेड्याकडे परतत होते. मात्र, बांभोरी पुलावर पोहोचताच त्यांच्या कारची कंटेनरशी जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, तिघेही गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत पाटील, पाळधी आऊट पोस्टचे प्रभारी भूषण कोते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही तरुणांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले.

या घटनेची माहिती समजताच नातेवाईक आणि परिचितांनी रुग्णालयात धाव घेतली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील यांनीही रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली.

जळगाव शहराजवळील बायपासचा काही भाग खचल्याने गेल्या अडीच महिन्यांपासून महामार्गावरील वाहतूक शहरातून वळविण्यात आली आहे. परिणामी, शहरातील प्रमुख रस्त्यांवर अवजड वाहनांची वर्दळ वाढली असून, अपघातांच्या घटनांमध्येही चिंताजनक वाढ होत असल्याचे चित्र आहे.या वाहतूक बदलानंतर बायपास आणि महामार्गावरील अपघातांच्या मालिकेत अडीच महिन्यांत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या चार दिवसांतील हा चौथा बळी असल्याचेही वृत्त आहे. गुरुवारी आकाशवाणी चौकाजवळील उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रविवारी बांभोरी पुलावर झालेल्या दुर्घटनेत एकाच वेळी तीन तरुणांचा जीव गेला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button