
जळगाव लाईव्ह न्यूज । रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. दिवाळी, पूजा आणि छठ सणाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने पुणे परिसरातील हडपसर ते मुजफ्फरपूर दरम्यान दोन विशेष ‘अमृत भारत’ गाड्या चालविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विशेष या दोन्ही गाड्या जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबणार मिळाला आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात धावणाऱ्या या गाड्यांच्या प्रत्येकी १२ फेऱ्या असणार आहेत.
सणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे नियमित रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी होत असून, प्रवाशांना आरक्षणासाठीही अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेने अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. हडपसर-मुजफ्फरपूरदरम्यान सुरू होणाऱ्या या विशेष रेल्वे सेवेमुळे महाराष्ट्रातून बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांना पर्यायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
२० ऑक्टोबरपासून पहिली गाडी
गाडी क्रमांक ०१४८१ हडपसर–मुजफ्फरपूर अमृत भारत साप्ताहिक विशेष ही २० ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्रत्येक मंगळवारी हडपसर येथून रात्री ७ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल. ही गाडी गुरुवारी दुपारी १२ वाजता मुजफ्फरपूर येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१४८२ मुजफ्फरपूर–हडपसर अमृत भारत साप्ताहिक विशेष ही २२ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक गुरुवारी मुजफ्फरपूर येथून दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी सुटेल. शनिवारी पहाटे २ वाजून ४५ मिनिटांनी ती हडपसर येथे पोहोचेल.
१९ ऑक्टोबरपासून दुसरी गाडी
गाडी क्रमांक ०१४५३ हडपसर–मुजफ्फरपूर अमृत भारत साप्ताहिक विशेष ही १९ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्रत्येक सोमवारी हडपसर येथून रात्री ७ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल. बुधवारी दुपारी १२ वाजता ती मुजफ्फरपूर येथे पोहोचेल. परतीच्या दिशेने गाडी क्रमांक ०१४५४ मुजफ्फरपूर–हडपसर अमृत भारत साप्ताहिक विशेष ही २१ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्रत्येक बुधवारी मुजफ्फरपूर येथून दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी सुटेल. शुक्रवारी पहाटे २ वाजून ४५ मिनिटांनी हडपसर येथे पोहोचेल.
या स्थानकांवर असणार थांबा?
या दोन्ही विशेष गाड्यांना दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, मदन महाल, कटनी, मैहर, सतना, मानिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, सोनपूर आणि हाजीपूर या महत्वाच्या स्थानकांवर थांबा आहेत.
अमृत भारत विशेष गाड्यांची रचना एकूण २२ डब्यांची असेल. त्यामध्ये ११ सामान्य श्रेणीचे डबे, ८ शयनयान श्रेणीचे डबे, १ पॅन्ट्री कार आणि दिव्यांग प्रवासी, सामान तसेच गार्डसाठी २ डबे असतील.





