
बोरगाव बुद्रुक येथे ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन; गुणवंत शाळांचा धनादेश व स्मृतिचिन्ह देऊन गौरव
जळगाव लाईव्ह न्यूज । “विज्ञान प्रदर्शनात बक्षीस मिळवण्यापेक्षा स्वतःच्या कल्पनेतून नवा प्रयोग करण्याची हिंमत अधिक महत्त्वाची आहे. प्रत्येक मुलामध्ये काहीतरी वेगळा गुण दडलेला असतो. शिक्षक आणि पालकांनी तो गुण ओळखून मुलांच्या कल्पनांना प्रोत्साहन दिले पाहिजे. विद्यार्थ्यांची जिज्ञासा कधीही थांबता कामा नये. आजच्या विद्यार्थ्यांमध्येच उद्याचे सी. व्ही. रमण आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम दडलेले आहेत. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर गरजेपुरताच करावा, त्याचे गुलाम बनू नये. विज्ञानाची कास धरताना आपली संस्कृती आणि संस्कारही जपावेत,” असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
धरणगाव तालुक्यातील सर्वज्ञ माध्यमिक विद्यालयात बोरगाव बु व शिक्षण विभाग, पंचायत समिती धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५४ व्या धरणगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व सेवा संकल्प अभियानाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, विज्ञान प्रदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि संशोधनवृत्तीला चालना देणारे व्यासपीठ आहे. प्रत्येक विद्यार्थी शास्त्रज्ञ होईलच असे नाही; मात्र वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करण्याची सवय त्याला आयुष्यभर उपयोगी पडते. विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील समस्या ओळखून शेती, पाणीबचत, पर्यावरण आणि दैनंदिन जीवनात उपयोगी पडतील असे नवनवीन प्रयोग करावेत. प्रयोग यशस्वी झाला नाही तरी खचून जाऊ नका. त्यातून शिकत राहा. आपल्या प्रयोगशीलतेच्या बळावर जिल्हा आणि राज्यस्तरावर शाळेचे व गावाचे नाव उज्ज्वल करा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच शिक्षकांचे वेतन वेळेवर अदा करण्याबाबत त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश दिले.
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानातील विजेत्यांचा गौरव
यावेळी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान सन २०२४-२५ मधील विजेत्या शाळांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धनादेश व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. प्राथमिक गटात तालुकास्तरावर प्रथम क्रमांकाच्या जि. प. प्राथमिक शाळा वाकटुकीला ३ लाख, द्वितीय क्रमांकाच्या बिलखेडे शाळेला २ लाख, तर तृतीय क्रमांकाच्या पिंपरी खुर्द शाळेला १ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. माध्यमिक गटात जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या सारजाबाई कुडे माध्यमिक विद्यालयाला ५ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. तसेच तालुकास्तरावर प्रथम क्रमांकाचे बा. च. भाटिया माध्यमिक विद्यालय, साकरे, द्वितीय क्रमांकाचे बी. जे. महाजन माध्यमिक विद्यालय, अनोरे व तृतीय क्रमांकाचे निळकंठेश्वर हायस्कूल, चावलखेडा यांचाही गौरव करण्यात आला. पालकमंत्र्यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले. तसेच स्पेलिंग बी स्पर्धेत जिल्हास्तरावर इयत्ता चौथी ते सातवीच्या गटात द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या बांभोरी प्र. चा. येथील कु. राजश्री नन्नवरे हिच्यासह विविध उपक्रमांत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
सेवा संकल्प अभियानाच्या पुस्तकांचे प्रकाशन; वृक्षारोपण
या कार्यक्रमात सेवा संकल्प अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देणाऱ्या पुस्तकाचे तसेच धरणगावच्या गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले लिखित बालकाव्यसंग्रहाचे प्रकाशन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते विद्यालयाच्या आवारात मोठ्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
सेवा संकल्प अभियानाची यशस्वी अंमलबजावणी
यावेळी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी सेवा संकल्प अभियानाचा आढावा मांडताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने विविध उपक्रम यशस्वीपणे राबविल्याचे सांगितले. अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची व त्यांच्या अंमलबजावणीची सविस्तर माहिती त्यांनी दिली. जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विज्ञानाची कास धरण्याचे आवाहन केले. विशेषतः कृषी क्षेत्रातील समस्या लक्षात घेऊन शेतीला उपयोगी पडतील असे नाविन्यपूर्ण प्रयोग आणि उपकरणे विद्यार्थ्यांनी विकसित करावीत, असे त्यांनी सांगितले. विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील कल्पकता आणि संशोधनवृत्तीला योग्य दिशा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी विज्ञान प्रदर्शन व सेवा संकल्प अभियानाच्या आयोजनामागील उद्देश आणि विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन उपशिक्षिका ज्योती राणे यांनी केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेले विज्ञान प्रयोग आणि नाविन्यपूर्ण संकल्पना विशेष आकर्षण ठरल्या. आभार मा. केंद्र प्रमुख प्रमोद सोनवणे यांनी मानले.
विज्ञान प्रदर्शनाचा गटनिहाय निकाल जाहीर
प्राथमिक गट (इयत्ता ६ वी ते ८ वी) : प्रथम – राजश्री प्रकाश नन्नवरे (जि. प. शाळा, बांभोरी प्र.चा.), द्वितीय – याशिका धीरज झवर (इम्पेरियल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी), तृतीय – देवयानी ज्ञानेश्वर पाटील (माध्यमिक विद्यालय, धारशेरी), तर उत्तेजनार्थ – विराज नरेंद्र महाजन (स. न. झवर विद्यालय, पाळधी).
माध्यमिक व उच्च माध्यमिक गट (इयत्ता ९ वी ते १२ वी) : प्रथम – मोहित मनोज मराठे व मोहित आबा मराठे (सर्वज्ञ माध्यमिक विद्यालय, बोरगाव), द्वितीय – गायत्री भरत पवार व कीर्ती योगेश पाटील (मा. गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, पाळधी), तृतीय – वरद विशाल करवाह (सारजाई दामोदर कुडे विद्यालय, धरणगाव), तर उत्तेजनार्थ – दुर्वाशी चंद्रशेखर देशमुख (इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय, धरणगाव).
प्राथमिक शिक्षक गट : प्रथम – दिनेश प्रल्हाद चौधरी (लिलाबाई स्कूल, पथराड), द्वितीय – मोसिन खान अजीज खान (जि. प. उर्दू शाळा, फुलेनगर).
माध्यमिक शिक्षक गट : प्रथम – पवन शिवाजी भदाणे (आश्रमशाळा, बोरगाव), द्वितीय – मिलिंद बापूराव पाटील (अंजनी ग्रुप, हिंगोणे).
प्रयोगशाळा सहायक गट : प्रथम – भाग्यश्री मनोहर नेमाडे (नांदेड स्कूल, नांदेड), द्वितीय – धनंजय प्रकाश शेवाळे (सर्वज्ञ माध्यमिक विद्यालय, बोरगाव).





