गुन्हेजळगाव शहर

जळगाव महामार्गावर अपघातांचे सत्र थांबेना! ट्रकच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून, आणखी एका भीषण अपघातात तरुणाला जीव गमवावा लागला आहे. शहरातील आकाशवाणी परिसरातील उड्डाणपुलावर भरधाव ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात खासगी वित्त कंपनीत शाखा अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या दुचाकीस्वार तरुणाचा ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. रवींद्र छबुलाल चौधरी असं मृत तरुणाचं नाव आहे.

रवींद्र छबुलाल चौधरी हे एका खासगी वित्त कंपनीत शाखा अधिकारी म्हणून कार्यरत होते. नेहमीप्रमाणे आज (१५ ऑक्टोबर) सकाळी हिरो एचएफ डिलक्स दुचाकीने (क्र. MH 19 DN 1282) कामावर जात असताना आकाशवाणीजवळील उड्डाणपुलावर त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने मागून जोरदार धडक दिली. या धडकेत ते ट्रकच्या चाकाखाली आले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

चौधरी हे कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती असल्याने त्यांच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताची बातमी समजताच त्यांचे नातेवाईक आणि कार्यालयातील सहकारी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धाव घेतली. यावेळी नातेवाइकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

तरसोद बायपासच्या वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर

दरम्यान, तरसोद बायपासची वाहतूक वळवल्यानंतर शहरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ आणि अपघातांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. आकाशवाणी उड्डाणपुलावरील या भीषण अपघातानंतर नागरिकांनी वाहतूक व्यवस्थापन आणि रस्ते सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. अशा अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button