गुन्हेजामनेर

जामनेर तालुक्यात भीषण अपघात ; पिकअपच्या धडकेत सासू-जावयाचा जागीच मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी-पहूर रस्त्यावरील गोगळी नदीच्या पुलावर बोलेरो पिकअप आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन सासू आणि जावयाचा जागीच मृत्यू झाला. विमलबाई ओंकार परदेशी (वय ७५, रा. गोंडखेड, ता. जामनेर) आणि राजू बाबुलाल परदेशी (वय ५५, रा. सातगाव डोंगरी, ता. पाचोरा) अशी मृतांची नावे असून यामुळे गोंडखेडसह सातगाव डोंगरी परिसरात शोककळा पसरली आहे.

विमलबाई परदेशी यांच्या पतीसह दोन मुलांचे यापूर्वीच निधन झाले होते. त्यामुळे त्या सातगाव डोंगरी येथे आपल्या विवाहित मुलीकडे राहत होत्या. नवरात्रोत्सवानिमित्त गोंडखेड या त्यांच्या मूळ गावी भावकीत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी जावई राजू परदेशी हे आपल्या दुचाकीवरून (क्र. एमएच १९ ईएच ०४९९) सासू विमलबाई यांना गोंडखेड येथे सोडण्यासाठी निघाले होते.

मात्र, शेंदुर्णी-पहूर रस्त्यावरील घोडेपीर बाबा दर्ग्यासमोरील गोगळी नदीच्या पुलावर त्यांच्या दुचाकीची बोलेरो पिकअपशी समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता मोठी असल्याने विमलबाई आणि राजू परदेशी यांचा जागीच मृत्यू झाला.

एकाच अपघातात सासू आणि जावयाचा मृत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नवरात्रोत्सवातील धार्मिक कार्यक्रमासाठी निघालेल्या दोघांवर काळाने घाला घातल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताच्या घटनेने गोंडखेड आणि सातगाव डोंगरी परिसरात शोककळा पसरली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button